...अखेर खैरेंनी मागितली आदित्य ठाकरेंची माफी;भावनेच्या भरात वक्तव्य केल्याची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 08:20 PM2020-03-16T20:20:07+5:302020-03-16T20:26:49+5:30
३२ वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय असतांना २९ वर्षीय आदित्य यांची माफी मागण्याची वेळ आल्याने शिवसेना बदलत असल्याचे स्पष्ट झाले
औरंगाबाद : शिवसेनेकडून राज्यसभेसाठी प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी संतापात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. ते वक्तव्य आपण भावनेच्या भरात केल्याचे नमूद करीत खैरे यांनी सोमवारी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषदेत जाहीरपणे माफी मागितली. शिवसेना नेते खा.संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर खैरे यांनी पिता-पुत्रांची माफी मागण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती.
३२ वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय असतांना २९ वर्षीय आदित्य यांची माफी मागण्याची वेळ आल्याने शिवसेना बदलत असल्याचे स्पष्ट झाले असून याबाबत खैरे यांना विचारले असता ते म्हणाले, माझे पक्षप्रमुखांशी बोलणे झाले आहे. त्यांना माझी भूमिका सांगितली आहे. जे काही होईल ते चांगलेच होईल. मी तीन दिवस नॉट रिचेबल नव्हतो, शहरातच होतो. मी मनपा निवडणुकीतील मतदार याद्यांमधील घोळाबाबत शोध घेत होतो. कुणी डिस्टर्ब करू नये म्हणून नॉटरिचेबल राहण्याचा फायदा होतो. आपल्याकडून काही चुका होत नाहीत.
राज्यसभेसाठी उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु चतुर्वेदी ‘तार्इं’चे (१२ मार्च रोजी चतुर्वेदी ‘बाई’असे बोलले होते.) नाव अचानक आल्याने माझा त्रागा झाला. भावनेच्या भरात मी बोललो. त्यामुळे वरिष्ठही नाराज झाले. मी कुठेही जाणार नाही. ३२ वर्ष सतत निवडून आलो आहे. स्मशानात जाईपर्यंत शिवसेनेचेच काम करील. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करील. आदित्य यांना वाईट वाटले असेल तर मी त्यांची माफी मागतो. मी शिवसेनेत तिसऱ्या पिढीसोबत काम करणारा शिवसैनिक आहे. मला पक्षाने खुप काही दिले आहे. ३ दिवस वातावरण शांत व्हावे, यासाठी नॉटरिचेबल होतो. यावेळी आ.संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, किशनचंद तनवाणी यांची उपस्थिती होती.
पहा व्हिडीओ :