अखेर जालना रोड, बीड बायपासचा निधी कापला; ७८९ कोटींऐवजी केवळ २९५ कोटींना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 11:14 AM2018-06-02T11:14:57+5:302018-06-02T11:15:46+5:30

शहरातील बहुचर्चित जालना रोड आणि बीड बायपास या दोन्ही रस्त्यांचा नॅशनल हायवे  अ‍ॅथॉरटी आॅफ इंडियाने निधी कापला आहे.

Finally, the funds for Jalna Road, Beed Bypass cut off; Only Rs 295 crores were approved instead of 789 crores | अखेर जालना रोड, बीड बायपासचा निधी कापला; ७८९ कोटींऐवजी केवळ २९५ कोटींना मंजुरी

अखेर जालना रोड, बीड बायपासचा निधी कापला; ७८९ कोटींऐवजी केवळ २९५ कोटींना मंजुरी

googlenewsNext
ठळक मुद्देबीड बायपाससाठी १२५ कोटी रुपयांचा, तर जालना रोडसाठी १५० कोटी रुपयांचा प्लान तयार करण्यात आला आहे.

औरंगाबाद : शहरातील बहुचर्चित जालना रोड आणि बीड बायपास या दोन्ही रस्त्यांचा नॅशनल हायवे  अ‍ॅथॉरटी आॅफ इंडियाने निधी कापला आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुण्यातून राज्यातील पत्रकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून देशभरातील सिंचन व दळणवळण प्रकल्पांत काय गुंतवणूक केली आहे, त्याची माहिती दिली. 

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कॉन्फरन्सिंगमध्ये त्यांना पत्रकारांनी जालना रोड आणि बीड बायपास येथील रस्त्यांप्रकरणी माहिती विचारली असता ते म्हणाले, बीड बायपाससाठी १२५ कोटी रुपयांचा, तर जालना रोडसाठी १५० कोटी रुपयांचा प्लान तयार करण्यात आला आहे. डीपीआर एनएचएआयकडे सादर करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१८ पर्यंत या कामाच्या निविदा निघतील. 

फेबु्रवारीतील केंद्रीय अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी तरतूद होण्याची अपेक्षा होती; परंतु तरतूद न झाल्यामुळे प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. २५ डिसेंबर २०१५ रोजी गडकरी यांनी केम्ब्रिज शाळेजवळील एका कार्यक्रमात १८ हजार कोटींच्या रस्ते बांधणीच्या कामाची घोषणा केली होती. त्यामध्ये जालना रोड, बीड बायपास या रस्त्यांच्या रुंदीकरणाची घोषणा ऐनवेळी करून त्यासाठी डीपीआर बनविण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. त्यानुसार १९ सप्टेंबर २०१६ रोजी संबंधित रस्त्यांचा उड्डाणपूल, भुयारी मार्गांसह ७८९ कोटी रुपयांचा डीपीआर दिल्लीतील एनएचएआयच्या मुख्यालयाकडे सादर करण्यात आला. 

मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्यासाठी २० कोटी
मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. २०१५ पासून जयभवानीनगर ते रेल्वेस्टेशनपर्यंतच्या रस्त्याची पाडापाडी करून रुंदीकरण करण्यात आले; परंतु तीन वर्षे त्या रस्त्याचे काम सुरू होण्यास मुहूर्त लागला नाही. रेल्वे उड्डाणपूल आणि रस्ता असे मिळून ही २० कोटी रुपयांची रक्कम असू शकते. अजून त्याबाबत पूर्णत: स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही.

औट्रमघाटासाठी ५ हजार कोटी
कन्नड ते चाळीसगाव या मार्गावरील औट्रमघाटासाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. ८ वर्षांपासून या कामाची चर्चा सुरू आहे. सर्व स्तरावरील एनओसी पूर्ण होत आल्या असून, हे काम नोव्हेंबर २०१८ पासून सुरू होणे अपेक्षित आहे. काही जर्मन कंपन्यांनीही या कामासाठी स्वारस्य दाखविले होते.

बीड बायपास होणार ३० मीटर रुंद
बीड बायपास हा रोड सध्या अपघात रोड म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या रोडच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव एनएचएआयने तयार केला. ३८९ कोटी रुपयांचा हा प्रस्ताव होता. आता त्याला १२५ कोटी रुपये देण्याचे अंतिम झाले आहे. म्हणजे हा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणातून फक्त चौपदरी केला जाईल. झाल्टा फाटा ते महानुभव आश्रम या १४ कि़मी. अंतरात तो रोड होणार आहे. यावरील सर्व उड्डाणपुले रद्द झाल्याचे दिसते. 

जालना रोड होणार  ४५ मीटर रुंद
जालना रोडचा प्रकल्प १४ कि़मी.चा आहे. तो पूर्वी ६० मीटर रुंद करण्याचा प्रस्ताव होता. केम्ब्रिज हायस्कूल ते नगरनाक्यापर्यंत रोडचा प्रस्ताव आहे. आता तो ४५ मीटर रुंद करण्यात येणार आहे. महापालिकेकडून भूसंपादन व अतिक्रमणासाठी सहकार्य मिळत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी सांगितले. ४०० कोटी रुपयांचा प्रकल्प आता १५० कोटींमध्ये होणार आहे. हा पहिला टप्पा आहे की, पूर्ण प्रकल्प किंमत याबाबत अजून काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही; परंतु सूत्रांनी सांगितले की, प्रकल्पाचा निधी कमी करण्यात आला आहे. जालना रोडचे फक्त सिमेंट काँक्रिटीकरण होणार आहे. १० कोटी रुपये चौपदरीकरणाचा खर्च प्रति कि़मी.प्रमाणे विचार केला तर जालना रोडसाठी १५० कोटी रुपये एवढाच निधी मिळाल्याचे निश्चित होते. या प्रकल्पावरील उड्डाणपूल व इतर सुविधा सगळ्या स्वप्नवत राहणार आहेत.

Web Title: Finally, the funds for Jalna Road, Beed Bypass cut off; Only Rs 295 crores were approved instead of 789 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.