...अखेर सहीने जीवनाला योग्य दिशा मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 07:18 PM2019-06-17T19:18:33+5:302019-06-17T19:18:33+5:30
एसपीआय काय आहे, हे आता जगालादेखील माहीत झाले आहे
- साहेबराव हिवराळे
ऐतिहासिक औरंगाबाद नगरीतील सैनिकी सेवापूर्व शिक्षणसंस्थेने घडविलेल्या आणि निवृत्तीनंतर येथे नवनिर्वाचित संचालक म्हणून आलेल्या निवृत्त कर्नल अमित राजेंद्र दळवी यांच्याशी साधलेला संवाद...
एसपीआयचा प्रवास कसा राहिला आणि जीवन कसे बदलले?
पालघर येथील वरखुंटी टिळक विद्यालयाच्या मराठी माध्यमात शालेय शिक्षण झाले. शालेय जीवनापासूनच सैन्य दलाचे आकर्षण राहिले. खाऊच्या पैशातील पाच रुपयांतून सैनिकी सेवापूर्व शिक्षणसंस्थेचा मनिआॅर्डर करून अर्ज मागविला; परंतु त्यावर वडिलांची सही पाहिजे होती. वडील न्यायाधीश असल्याने हिंमत होत नव्हती. अखेर आई-वडिलांकडे अर्ज घेऊन गेलो आणि त्यांनी स्मितहास्य करीत स्वाक्षरी केली. त्या सहीने योग्य रस्ता मिळाला. येथे ‘दृढ प्रयत्नेन सिध्यते’हे ब्रीदवाक्य लागू पडते.
कोणत्या संधी येथून मिळतात?
शिक्षणासह सैन्य दलात जाण्याच्या मोठ्या संधी आहेत. प्रशासकीय सेवेतही अनेकांनी आपले करिअर घडविलेले आहे. शालेय जीवनातच देशसेवेची मुळे रुजविण्याचे काम एसपीआयमधून केले जाते. नोकरीसाठीच शिक्षण नसते तर देशसेवा हा त्याच्या मागचा मुख्य हेतू असतो. लेखी व तोंडी परीक्षा, प्रशिक्षण ही तुमच्या आयुष्यातील खरी शिदोरी आहे.
औरंगाबादचे ऋण फेडणे आहे का?
व्हाईस अॅडमिरल मनोहर औटी, कर्नल जे. व्ही. काटकर यांच्या पथकाने मुलाखत घेतली होती. औरंगाबादच्या शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयात १२ वीपर्यंचे शिक्षण घेतले. दोन वर्ष खडतर प्रशिक्षणानंतर ३० डिसेंबर १९९० मध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला पुणे येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली. प्रथम नियुक्ती ७३ मेडियम रेजिमेंटमध्ये झाली. २३ वर्षे ३ महिन्यांनी कर्नल म्हणून सेवानिवृत्तीनंतर एमपीएससी अंतर्गत जानेवारी २०१९ ला औरंगाबाद एसपीआय मिळाल्याने ऋण फेडण्याची संधी मिळाली.
ऐतिहासिक औरंगाबादने देशाला खूप काही दिले
वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्या काळात लावलेल्या रोपट्याने प्रत्येक सत्रातील छात्राने यशस्वी आणि देदीप्यमान अधिकारी दिले आहेत. त्यात ५०० लष्करी तर १२०० प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काही दिवसांत तिन्ही दलातील प्रमुख एसपीआयचे असतील अशी सक्षम तयारी केली जात आहे. दळवी यांच्या वर्गमित्राच्या मुलांचा प्रवेश पाहून परंपरागत देशभावना नसानसात भरलेली आहे, असा अभिमान वाटतो.
मुलींच्या प्रशिक्षणासाठी प्रस्ताव
एसपीआय काय आहे, हे आता जगालादेखील माहीत झाले आहे. हा शासकीय उपक्रम असून, येथे सध्या फक्त मराठवाडा तसेच अख्ख्या महाराष्ट्रातून मुलांना प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेतून मुलींनाही सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पुन्हा पाठविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
औरंगाबादने ८ ब्रिगेडिअर दिले आहेत,महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील युवकांनी सैनिकी सेवापूर्व संस्थेत प्रवेशातून देशसेवा, प्रशासकीय सेवेत जावे. - संचालक अमित दळवी