...अखेर ‘त्या’ मातेला मिळाले दुर्मिळ बॉम्बे ब्लड ग्रुपचे रक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 02:28 PM2020-09-15T14:28:47+5:302020-09-15T14:31:17+5:30
बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तगट उपलब्ध नसतानाही महिलेची प्रसूती यशस्वी करण्याची किमया घाटीतील डॉक्टरांनी केली.
औरंगाबाद : घाटीत दाखल असलेल्या मातेला अखेर रविवारी रात्री उशिरा जालना येथील ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ रक्तगटाच्या दात्याचे रक्त मिळाले आणि डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तगट उपलब्ध नसतानाही जालना जिल्ह्यातील मनीषा सोनवणे यांची प्रसूती यशस्वी करण्याची किमया घाटीतील डॉक्टरांनी केली. प्रसूतीनंतर अवघ्या एक दिवसाच्या मुलीच्या मातेला या रक्ताची नितांत गरज पडली. त्यासाठी शोध घेण्यात आल्यानंतर राज्यभरातील दाते या मातेसाठी सरसावले होते.
१६ सप्टेंबरपासून जिल्हा व शहरातील बाजारपेठांवर वेळेचे बंधनhttps://t.co/idoU3JZ1aG
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 15, 2020
या मातेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात मदतीसाठी विचारणा करण्यात आली. रक्तगटाची सहज उपलब्धता होत नव्हती. अखेरीस हा रक्तगट असलेल्या नाशिक, नांदेड आणि जालना येथील दात्यांनी पुढाकार घेतला. यात दात्याचे रक्त घेण्यासाठी नातेवाईक रविवारी सायंकाळी जालना येथे रवाना झाले. नियोजनाप्रमाणे जालना येथील दात्याचे रक्त उपलब्ध झाले आणि रात्रीतून या मातेला रक्त देण्यात आले. त्यामुळे मातेची प्रकृती धोक्यात जाण्यापासून टळल्याचे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी सांगितले.
रक्त उपलब्ध नसताना घाटीतील डॉक्टरांनी केली यशस्वी प्रसूतीhttps://t.co/47MrxsIN6P
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 15, 2020
दुर्मिळ रक्तगट
बहुतांश वेळी ‘ओ’ निगेटिव्ह हा ब्लड ग्रुप सर्वात दुर्मिळ असतो आणि हा रक्तगट फारच कमी लोकांमध्ये आढळतो, असे म्हटले जाते; परंतु ओ निगेटिव्हपेक्षाही दुर्मिळ रक्तगट आहे बॉम्बे ब्लड ग्रुप. दर दहा लाख लोकांच्या मागे केवळ ४ जण या ब्लड ग्रुपचे सापडतील, असे सांगितले जाते.