अखेर महापालिकेची अतिक्रमणे, हातगाड्यांवर कारवाई सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 05:24 PM2019-11-20T17:24:55+5:302019-11-20T17:26:13+5:30

पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, औरंगपुरा, शाहगंजमध्ये ३५ पेक्षा अधिक लहान-मोठी अतिक्रमणे हटविली

Finally, the municipal corporation starts to remove encroachments,street vendors | अखेर महापालिकेची अतिक्रमणे, हातगाड्यांवर कारवाई सुरू 

अखेर महापालिकेची अतिक्रमणे, हातगाड्यांवर कारवाई सुरू 

googlenewsNext
ठळक मुद्देरस्त्यावर चालणे सुसह्य करण्यासाठी पोलीस आणि महापालिकेची संयुक्त कारवाई 

औरंगाबाद : शहरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यास मंगळवारी महापालिकेने सुरुवात केली. सकाळी १२ वाजेपासून पैठणगेट येथून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे, हातगाड्या जप्तीचा सपाटाच महापालिकेने लावला. त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली. हातगाडीचालक सैरावैरा गल्लीबोळांमध्ये पळत होते. अवघ्या दीड तासात महापालिकेने टिळकपथ, गुलमंडी, औरंगपुरा येथे कारवाई केली. ३५ पेक्षा अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली.

अतिक्रमणांमुळे शहरात वाहनधारकांसह सर्वसामान्यांना पायी ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक पोलीस, महापालिका निव्वळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे छायांकित वृत्त ‘लोकमत’ने १६ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केले. याची दखल घेऊन पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत शनिवारी बैठक घेण्यात आली. बैठकीत अतिक्रमणे  हटविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे आश्वासन मनपातर्फे देण्यात आले होते. नियोजित कार्यक्रमानुसार मंगळवारपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मोहिमेसाठी वाहतूक पोलीस, पोलीस कर्मचारी असा मोठा बंदोबस्त देण्यात आला होता.

पैठणगेट येथून कारवाईला सुरुवात करताच पुढील हातगाडीचालक, फेरीवाले गायब झाले. रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या काही हातगाड्या मनपा पथकाच्या हाती लागल्या. या हातगाड्या जप्त करण्यात आल्या. टिळकपथवरील बहुतांश हातगाडीचालक फरार झाले होते. लोखंडी टपऱ्या, व्यापाऱ्यांनी लावलेले बोर्ड आदी साहित्य जप्त करण्यात आले. गुलमंडी येथील परिसरही चकचकीत करण्यात आला. मात्र, महापौरांच्या आदेशानंतरही या भागातील पार्किंग सुरूच आहे.महापालिका आणि पोलिसांच्या या संयुक्त मोहीमेत पुढे बाराभाई ताजिया ते अंजली चित्रपटगृह या रस्त्यावर कारवाई सुरू करण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली छोटी-छोटी अतिक्रमणे काढण्यात आली. महात्मा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत कारवाई सुरू असताना महापालिकेची सर्व वाहने साहित्याने खचाखच भरली. वाहनांमध्ये जप्त केलेले साहित्य ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती. नागेश्वरवाडी पुलापर्यंत कशीबशी मोहीम राबविण्यात आली.

सायंकाळी ४.३० नंतर शाहगंज चमन भागात कारवाईला सुरुवात करण्यात आली. महापालिकेच्या पथकाला पाहून अनेक हातगाडीचालक, फेरीवाले पसार झाले होते. मोजकेच फेरीवाले मनपा पथकाच्या हाती लागले. चमन परिसरातील चारही बाजूचे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले. या कारवाईत पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे, संजय जक्कल, शिवदास राठोड, इमारत निरीक्षक जे. ई.जाधव, एल.एल.कुलकर्णी, पी.बी. गवळी, मझहर अली, सय्यद जमशीद, आर.एस. राचतवार आदींची उपस्थिती होती.

वाहतूक सुरळीत राहावी हीच प्रामाणिक इच्छा
शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलीस यंत्रणा १२ महिने प्रयत्नशील असते. दररोज ५०० पेक्षा अधिक वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. मागील चार महिन्यांमध्ये अपघातांचे प्रमाणही कमी झाले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे, फुटपाथवरील अतिक्रमणे काढणे हे महापालिकेचे काम आहे. त्यांना कधीही कोणतीही मदत लागत असल्यास आम्ही तत्पर असतो. मंगळवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामुळे बराच फरक पडेल.
- मीना मकवाना, पोलीस उपायुक्त

नियोजित कार्यक्रमानुसारच कारवाई 
शनिवारी महापालिका आणि पोलीस यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीत अ‍ॅक्शन प्लान तयार करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार महापालिकेने पुढील काही दिवसांसाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. नियोजित कार्यक्रमानुसार पुढेही कारवाई सुरू राहणार आहे. सकाळी कारवाई केल्यावरही सायंकाळी पथकाकडून पुन्हा पाहणी करण्यात येईल. भविष्यात पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत, यासाठी मनपा प्रयत्नशील आहे.
- रवींद्र निकम, उपायुक्त, मनपा

Web Title: Finally, the municipal corporation starts to remove encroachments,street vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.