अखेर ‘क्रांती’ला पालकांनी स्वीकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:38 PM2018-06-05T12:38:14+5:302018-06-05T12:47:32+5:30
जन्मानंतर अवघ्या काही दिवसांतच अनाथालयात दाखल होण्याची वेळ आलेल्या ‘क्रांती’ तिच्या पालकांनी आज सकाळी स्वीकारले.
औरंगाबाद : जन्मानंतर अवघ्या काही दिवसांतच अनाथालयात दाखल होण्याची वेळ आलेल्या ‘क्रांती’ तिच्या पालकांनी आज सकाळी स्वीकारले. औरंगाबादेतील सिडको एन ४ मधील भारतीय समाज सेवासंघाच्या अनिकेतन या अनाथालयात हस्तांतरणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यात बालकल्याण समितीचे पदाधिकारी आणि अनाथालयाच्या संचालिका यांनी थिटे दाम्पत्याच्या समुपदेशनात महत्त्वाची भूमिका बजावली.
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कुप्पा येथे राहणाऱ्या छायाबाई राजू थिटे यांची शासकीय रुग्णालयात ११ मे रोजी प्रसुती झाली. त्यांना मुलगी झाली असली तरी डॉक्टर आणि परिचारिकांच्या गोंधळामुळे नोंदवहीत मुलगा झाल्याचे नोंदवले गेले. दरम्यान, मुलीची प्रकृती खालावली. दहा दिवस हा घोळ सुरुच होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत 'डीएनए' चाचणी करण्याचा निर्णय घेतला. याचा अहवाल आल्यानंतर मुलीला थिटे दाम्पत्यास सोपविण्यात आले. मात्र, पुन्हा अवघ्या २२ तासांतच थिटे दाम्पत्याने विचार बदलला आणि मुलीला औरंगाबादेतील भारतीय समाज सेवा संघाच्या अनिकेतन या अनाथालयात दाखल केले.
पालकांना 'डीएनए'बद्दल माहितीच नाही
मुलीवर अनाथालयात दाखल होण्याची वेळ आल्याने अनेकांचे मन हेलावले. दरम्यान, जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड. ज्योती पत्की, सदस्या अॅड. अनिता शिऊरकर, डॉ. मनोहर बन्सवाल व भारतीय समाज सेवा संघाच्या संचालिका वसुधा जातेगावकर यांनी थिटे दाम्पत्याचे समुदेशन करण्याचा निर्णय घेतला. यात अनेक बाबी उघडकीस आल्याचे जातेगावकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. 'डीएनए' अहवाल काय असतो हेच मुळात थिटे दाम्पत्यास माहीत नव्हते. 'डीएनए' अहवालही त्यांना दाखविण्यात आला नव्हता, असे त्यांच्याशी चर्चा करताना दिसून आले. लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेज याचा विचार करुन या दाम्पत्याने पोटची मुलगी नाकारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु 'डीएनए' अहवालास आव्हान देता येत नाही. हा अहवालच अंतिम असतो, असे थिटे दाम्पत्यास सांगण्यात आले. तर 'डीएनए' अहवाल मिळण्यास दोन ते चार वर्षे लागतात, असे काही लोकांनी या दाम्पत्यास सांगितले होते. त्यामुळे हे दाम्पत्य गोंधळून गेले होते.
असे केले समुपदेशन
शासनाला विनंती करुन 'डीएनए' अहवाल शक्य तितक्या लवकर देण्याची विनंती करण्यात आल्याचे या दाम्पत्यास सांगितले. त्यानंतर त्यांना 'डीएनए' अहवाल काय असतो, हे सविस्तरपणे समजावून सांगितले. तेव्हा त्यांचे मनपरिवर्तन झाले. त्यानंतर भारतीय समाज सेवासंघाच्या अनिकेतन या अनाथालयात मुलगी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड. ज्योती पत्की, अॅड. अनिता शिऊरकर, डॉ. मनोहर बन्सवाल, भारतीय समाज सेवासंघाच्या अनिकेतन या अनाथालयाच्या संचालिका वसुधा जातेगावकर, पर्यवेक्षिका पवार, प्रज्ञा घुले, मिनाक्षी पाटील, आरती देशमुख आदी उपस्थित होते.
( बीडच्या ‘क्रांती’ला मिळणार पुन्हा आईची माया )