अखेर शिक्षकांना मिळाल्या पदस्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:38 AM2017-12-13T00:38:00+5:302017-12-13T00:38:08+5:30
आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ३९ शिक्षकांना अखेर मंगळवारी सायंकाळी समुपदेशन पद्धतीद्वारे पदस्थापना देण्यात आल्या. उद्या, बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास या शिक्षकांना शाळांवर रुजू होण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ३९ शिक्षकांना अखेर मंगळवारी सायंकाळी समुपदेशन पद्धतीद्वारे पदस्थापना देण्यात आल्या. उद्या, बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास या शिक्षकांना शाळांवर रुजू होण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.
आंतरजिल्हा बदलीने औरंगाबाद जि.प.मध्ये आलेल्या शिक्षकांना सुरुवातीला आॅगस्ट महिन्यात पदस्थापना देण्यात आली होती. त्यानंतर दुसºया टप्प्यात काही शिक्षक आले होते. त्यांनाही पदस्थापना देण्यात आली. पहिल्या टप्प्यात आलेल्या शिक्षकांपैकी स्तनदा माता व गरोदर माता शिक्षिकांना पदस्थापना बदलून हव्या होत्या. यासाठी जवळपास १८ शिक्षिकांनी तब्बल तीन महिने बरेच प्रयत्न केले; परंतु आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे रिक्त जागांचे पोर्टल खुले होत नव्हते. त्यामुळे या शिक्षिकांनी पदस्थापनेच्या प्रतीक्षेत शिक्षण विभागाचे उंबरठे झिजवले.
‘लोकमत’ने पदस्थापनेचा विषय सातत्याने मांडला. मंगळवारी पदस्थापना मिळण्याची प्रतीक्षा संपुष्टात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी यासंदर्भात काल सोमवारीच संकेत दिले होते. मंगळवारी जिल्हा परिषद सभागृहात अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाºयांच्या उपस्थितीत ३९ शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्यात आल्या. या प्रक्रियेसाठी उशीर झाल्यामुळे सदरील शिक्षकांना उद्या बुधवारी शाळांवर रुजू होण्याचे आदेश दिले जाणार आहेत. तथापि, कालपासून काही दलालांनी सोयीच्या जागा मिळवून देतो, अशी थाप देत शिक्षकांना घेरले होते. मात्र यासंबंधी ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केल्याने दलालांच्या मनसुब्यावर पाणी फिरले.
सोयगाव वगळता सर्व तालुक्यांना न्याय
रिक्त जागांनुसार सोयगाव तालुका वगळता जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील शाळांना शिक्षकांच्या नेमणुका देण्यात आल्या. यामध्ये औरंगाबाद- ७, पैठण- ५, गंगापूर- ४, वैजापूर- ३, खुलताबाद- ८, कन्नड- ४, फुलंब्री- ३, सिल्लोड- ५.
पदस्थापना मिळालेल्या शिक्षकांचे वर्गीकरण
ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार आज अपंग शिक्षक- २, थॅलेसिमिया आजाराने ग्रस्त शिक्षक- १, स्तनदा व गरोदर माता शिक्षिका- १८, पती-पत्नी एकत्रीकरण- १२, अवघड क्षेत्रात- ६ अशा एकूण ३९ शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्या.