...अखेर गळ टोचून घेण्याची प्रथा झाली बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 07:58 PM2019-04-26T19:58:44+5:302019-04-27T15:20:32+5:30
कायद्याच्या बडग्याने का होईना अत्यंत अघोरी म्हणून मानली गेलेली ही गळ टोचण्याची प्रथा बंद झाली.
- स. सो. खंडाळकर
अखेर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा विजय झाला. मांगीरबाबांच्या यात्रेतील गळ टोचून घेण्याची प्रथा बंद झाली. वर्षानुवर्षे चालत आलेली ही प्रथा बंद होणारच नाही, असा दावा केला जात होता. पण एकापाठोपाठ एक अशा अनेक अनिष्ट रूढी- परंपरा या यात्रेतून हद्दपार होताहेत. पूर्वी या यात्रेत डफडे वाजविण्याची प्रथा होती. त्याविरुद्ध मातंग समाजातील सुशिक्षित युवकांनी आंदोलन केले आणि ती प्रथा बंद झाली. आता कायद्याच्या बडग्याने का होईना अत्यंत अघोरी म्हणून मानली गेलेली ही गळ टोचण्याची प्रथा बंद झाली.
औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न वराळे आणि न्या.नितीन वराळे यांनी यासंदर्भात दिलेले निर्देश खूपच मोलाचे आहेत. लाल सेनेचे अध्यक्ष गणपत भिसे यांनी अॅड. अंगद कानडे यांच्यामार्फत महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ च्या अनुसूची ३ प्रमाणे स्वत:च्या अंगाला इजा करणे बेकायदेशीर असून, ही अनिष्ट प्रथा लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करीत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
कायद्याचा बडगा...
मांगीरबाबांची यात्रा सध्याही सुरू आहे. ती २३ एप्रिलपासून सुरू झाली. या तीन दिवसांत तरी गळ टोचून घेण्याची घटना घडलेली नाही. कायद्याच्या बडग्यामुळेच हे शक्य झाले. बघ्याची भूमिका घेतल्यास पोलीस आणि देवस्थान न्यासाला सहआरोपी करण्याचे आदेश न्या. वराळे व न्या. सांबरे यांनी दिलेले आहेत. त्यामुळे पोलीस आणि देवस्थान न्यास सतर्क झालेले आहेत. गळ टोचून घ्यायला येणाऱ्यांची संख्या कमी नाही. टोचू द्या असा आग्रह धरलाही गेला. गुन्हा दाखल होईल व पुढे शिक्षाही होईल, या भीतीने यावर्षी तरी या यात्रेत गळ टोचले गेले नाहीत. यापुढे सुद्धा कायद्याचे पालन होतच राहावे व ही अघोरी प्रथा समूळ बंद व्हावी, अशी अपेक्षा आहे.
कायदा सर्वांसाठी समानच...
केवळ मांगीरबाबांच्या यात्रेचा हा प्रश्न नाही. ज्या- ज्या यात्रांमध्ये जिभेतून गळ टोचणे, कंबरेत गळ टोचणे, नवसापोटी कोंबड्या- बकऱ्यांचा बळी देणे या प्रथा व्हायलाच पाहिजे. कारण कायदा सर्वांसाठी समान आहे. हा कायदा व्हावा यासाठी मोठा संघर्ष महाराष्ट्राने बघितला आहे. त्यातूनच नरेंद्र दाभोलकर व अंधश्रद्धा निर्मूलनाचा, विवेकनिष्ठतेचा व विज्ञाननिष्ठतेचा आग्रह धरणाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. दाभोलकर यांची तर हत्या झाली.
औरंगाबादपासून जवळच असलेल्या शेंद्रा गावच्या मांगीरबाबांच्या यात्रेच्या बातम्या १९८४ पासून वर्तमानपत्रांतून यायला लागल्या. तेही लोकमतमुळे. पूर्वी अशी काही यात्रा असते, हेसुद्धा माहीत नव्हते. अर्थात मांगीरबाबांचे यात्रेकरू महाराष्ट्रभर पसरलेले. वर्तमानपत्रांत बातम्या आल्या काय आणि न आल्या काय, यात्रेकरू यात्रेत येणार म्हणजे येणारच. नवसासाठी मांगीरबाबा प्रसिद्ध. नवस तरी किती विचित्र. लेकरू होऊ दे, नोकरी लागू दे, बांधाचं भांडण मिटू दे हे नवस नेहमीचेच. पण यापेक्षाही अनेक भन्नाट नवस बोलले जातात आणि ते कोंबड्या- बकऱ्यांचा बळी देऊन फेडले जातात. हे असे अनेक वर्षे चालू आहे.
नवसापोटी गळ टोचून घेण्यासाठी महिलांचा पुढाकार मोठा. गळ टोचून घेण्यासाठी आधी उपवास करावे लागतात आणि वाजत गाजत मांगीरबाबांच्या आधी असलेल्या मारुती मंदिरापर्यंत जावे लागते. यू आकाराचा आकडा कमरेत टोचल्याबरोबर संबंधित महिला किंवा पुरुष ‘मांगीरबाबा की जय’ म्हणत पळत सुटतात. मांगीरबाबांच्या समोर गेले की अंगात येते. तेथे रेवड्या उधळल्या जातात. नारळ फोडले जातात.
विचारांचा जागर व्हावा....
मांगीरबाबा देवस्थान न्यासाला यात्रेचे भरपूर उत्पन्न आहे. पण त्यातून गावचा विकास होताना दिसत नाही. कधी हिशेबही सादर होत नाही. देव मातंगांचा, पण ट्रस्ट मातंगांच्या हातात नाही. यात्रेत प्रबोधनाचे कार्यक्रम व्हायला हवेत. अंधश्रद्धा निर्मूलनावर भर द्यायला हवेत. मांगीरबाबांबरोबर फुले-शाहू- आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचाही जागर या यात्रेत व्हायला हवा. तरच अंधश्रद्धेला थारा मिळणार नाही.....!