अखेर आधार हॉस्पिटलकडून खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:04 AM2021-04-20T04:04:51+5:302021-04-20T04:04:51+5:30
वैजापूर : हॉस्पिटलमध्ये दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या अनुषंगाने अखेर लाडगाव रोडवरील आधार हाॅस्पिटलने आपला खुलासा प्रशासनाला सादर केला आहे. तातडीने ...
वैजापूर : हॉस्पिटलमध्ये दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या अनुषंगाने अखेर लाडगाव रोडवरील आधार हाॅस्पिटलने आपला खुलासा प्रशासनाला सादर केला आहे. तातडीने खुलासा देण्याचे निर्देश असताना सुद्धा या हॉस्पिटलने आपले म्हणणे मांडण्यास दिरंगाई केली होती. स्थानिक प्रशासनही याकडे कानाडोळा करत असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत होता. मात्र, लोकमतच्या वृत्तानंतर संबंधित हॉस्पिटलने तातडीने आपला खुलासा सादर केल्यानंतर प्रशासन सुद्धा खडबडून जागे झाले.
आधार हाॅस्पिटलमध्ये विनापरवाना कोरोना रुग्णांवर उपचार होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यातच गेल्या आठवड्यात या हाॅस्पिटलमध्ये परराज्यातील एक आणि चांडगाव (ता.वैजापूर) येथील एक अशा दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे संबंधित माहिती प्रशासनाला न कळवता दोन्ही मृतदेह नातेवाइकांकडे परस्पर देऊन अंत्यसंस्कार उरकण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. याची जिल्हाधिकाऱ्यांची दखल घेत हॉस्पिटलची तपासणी करण्याचे निर्देश दिले हाेते. त्याअनुषंगाने गुरुवारी (दि.१५) तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पथकाने आधार हॉस्पिटलची तपासणी करत त्यांच्याकडून तातडीने खुलासा मागवला होता. मात्र, चार दिवस उलटूनही संबंधितांनी आपले म्हणणे मांडले नव्हते. त्यामुळे लोकमतने पुन्हा सोमवारच्या (दि.१९) अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध करत याकडे सर्वांचे लक्ष्य वेधले. याची दखल घेत संबंधित हॉस्पिटलने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आपला खुलासा तातडीने सादर केला. आता प्रशासकीस पातळीवर प्राप्त झालेल्या खुलाशाची पडताळणी करण्यात येणार असून, त्यानंतर कारवाईचे धोरण ठरविण्यात येणार असल्याचे संकेत आहे.
---- कोट ----
आधार हाॅस्पिटलचे डाॅ. ईश्वर अग्रवाल यांनी आपला खुलासा सादर केला आहे. यात संबंधितांनी आपले म्हणणे मांडले आहे. या खुलाशाची तपासणी करून त्यानंतर संबंधितावर काय कारवाई करायची याचा निर्णय घेत सदरील अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे.
- माणिक आहेर, उपविभागीय अधिकारी, वैजापूर