अखेर निमशिक्षकांच्या ज्येष्ठता यादीला मुहूर्त !
By Admin | Published: November 16, 2016 12:09 AM2016-11-16T00:09:04+5:302016-11-16T00:08:10+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषदअंतर्गत निमशिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता
उस्मानाबाद : जिल्हा परिषदअंतर्गत निमशिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. बारावी ‘सायन्स’ असलेल्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नती देण्यास हिरवा कंदिल दिला. त्यानंतरच खऱ्या अर्थाने निमशिक्षकांच्या आशा उंचावल्या आहेत. शासन आदेशानुसार प्राथमिक शिक्षण विभागाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हाभरातील पात्र असलेल्या जवळपास १२६ निमशिक्षकांची ज्येष्ठता यादी तयार करून प्रसिद्धही करण्यात आली आहे. त्यामुळे निमशिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत निमशिक्षकांच्या नियुक्तीचे भिजत घोंगडे एक -दोन नव्हे, तर तब्बल चार ते पाच वर्षांपासून कायम होते. नियुक्ती देण्यात यावी, या मागणीसाठी संबंधित शिक्षकांनी सातत्याने आंदोलने, उपोषण केली. मंत्रालयस्तरापर्यंत निवेदनेही दिली. परंतु, सदरील प्रश्न मार्गी लागता लागत नव्हता. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांच्या कार्यकाळात जवळपास ८२ निमशिक्षकांना नियुक्ती देण्यात आली होती. परंतु, सदरील नियुक्त्या देताना, ज्येष्ठता यादी डावलल्याचा आरोप उर्वरित निमशिक्षकांनी केला होता. त्यामुळे ही प्रक्रिया चौकशीच्या फेऱ्यात सापडली होती. सातत्याने आरोप होऊ लागल्यानंतर सदरील प्रक्रियेच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील समितीने संपूर्ण प्रक्रियेची चौकशी केली. चौकशीअंती समितीनेही सदरील प्रक्रिया राबविताना ज्येष्ठता यादी डावलल्याचा ठपका ठेवला होता. हे सर्व घडत असतानाच नियुक्ती न मिळालेल्या निमशिक्षकांनी न्यायालयातही धाव घेतली होती. तयावर न्यायालयामध्ये जिल्हा परिषदेकडून म्हणणे सादर करण्यात आले होते. नव्याने ज्येष्ठता यादी तयार करून गुरूजींना नियुक्ती देऊ, असे न्यायालयात सांगण्यात आले होते.
दरम्यानच्या काळात नियुक्ती दिलेल्या संबंधित ८२ गुरूजींना कार्यमुक्त करण्यात आले. या प्रक्रियेनंतर लागलीच ज्येष्ठता यादी तयार करून उपलब्ध रिक्त जागेवर निमशिक्षकांना नियुक्ती देणे अपेक्षित होते. परंतु, जिल्हाभरात प्राथमिक शिक्षकांच्या जागा रिक्त नसल्याने शिक्षण विभाग पेचात सापडला होता. दरम्यानच्या काळात संबंधित सर्व गुरूजींनी मिळून आंदोलनही केले. परंतु, रिक्त जागाच नसल्याने शिक्षण विभागही हतबल होता.
त्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी बारावी सायन्स असलेल्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर गुरूजींच्या रिक्त जागेवर नियुक्ती देण्यास मंजुरी देण्यात यावी, अशा आशयाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. या प्रस्तावासाठी वेळावेळी पाठपुरावा करण्यात आल्यानंतर शासनाने अखेर त्यास मंजुरी दिली. शासनाच्या या निर्णयामुळे निमशिक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून १२६ शिक्षकांची ज्येष्ठता यादी तयार करण्यात येत होती. सदरील यादीचे काम पूर्ण झाल्यानंतर १५ नाव्हेंबर रोजी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र निमशिक्षकांना दिलासा मिळाला आहे.(प्रतिनिधी)