अखेर शिवसेनेने नेमले औरंगाबादमधील ग्रामीणमधील निष्ठावंत पदाधिकारी
By बापू सोळुंके | Published: August 27, 2022 07:20 PM2022-08-27T19:20:19+5:302022-08-27T19:21:09+5:30
शिंदे गटात गेलेल्या जिल्ह्यातील आमदारांसोबत त्यांचे समर्थक असलेले पक्षाचे पदाधिकारीही गेले.
औरंगाबाद : शिवसेनेच्या पाच बंडखोर आमदारांसोबत पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला समर्थन दिल्यानंतर शिवसेनेने त्यांच्या पदावर निष्ठावान शिवसैनिकांच्या नियुक्त्या केल्या.
जिल्ह्यातील सहापैकी पाच शिवसेना आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात बंडखोरी करीत एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले. शिंदे गटात गेलेल्या जिल्ह्यातील आमदारांसोबत त्यांचे समर्थक असलेले पक्षाचे पदाधिकारीही गेले. या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हाकलपट्टी न करता शिवसेनेने त्यांच्या जागेवर निष्ठावंत शिवसैनिकांच्या नियुक्त्या केल्या.
नुकत्याच जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. सिल्लोड तालुक्यातील उपजिल्हाप्रमुखपदी सुदर्शन अग्रवाल, तालुकाप्रमुखपदी रघुनाथ घडामोडे, विधानसभा संघटकपदी रघुनाथ चव्हाण तर तालुका संघटकपदी भास्करराव आहेर पाटील तर शहरप्रमुखदी मच्छींद्र घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली. तर सोयगाव तालुकाप्रमुखपदी दिलीप मचे, तालुका संघटकपदी गुलाबराव कोलते, पैठण तालुकाप्रमुखपदी मनोज पेरे, फुलंब्री विधानसभा मतदारसंघांतर्गत शहरातील १२ वॉर्डासाठी शहरप्रमुखपदी ज्ञानेश्वर डांगे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच कन्नड तालुकाप्रमुखपदी संजय मोटे यांची नेमणूक करण्यात आली.