अखेर क्रीडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरमध्ये; अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 04:36 PM2023-03-09T16:36:04+5:302023-03-09T16:39:21+5:30
जागा निश्चित झाल्यानंतरही नियोजित क्रीडा विद्यापीठ तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी पुण्याला पळवले होते
छत्रपती संभाजीनगर: पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना केली. वाळूज येथे हे विद्यापीठ उभारण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
सन २०१४ - २०१९ या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठ उभारण्याची घोषणा केली होती. यासाठी करोडी येथील १७० एकर जागेची देखील निश्चिती झाली. मात्र, सन २०१९ मध्ये सरकार बदलताच तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी क्रीडाविद्यापीठ पुण्याला पळवत बालेवाडी येथे उभारले. या निर्णयावर मोठी टीका झाली होती. तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पुण्यात विद्यापीठ उभारण्याचा निर्णय योग्य असल्याचे सांगत दुसरे क्रीडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे उभारू असे आश्वासन दिले होते. परंतु, त्यानंतर राज्यातील सरकार बदलले. मात्र, आता छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पात केली. या विद्यापीठासाठी तब्बल ५० कोटी निधींची तरतूद देखील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाड्यासह विदर्भ, खान्देशातील उत्तम क्रीडापटूंना दर्जेदार सरावासाठी छत्रपती संभाजीनगर येथील करोडी परिसरातील गट नं. २४ येथील १७० एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येईल. या विद्यापीठात क्रीडा संदर्भात विविध अभ्यासक्रम असतील. याद्वारे शारीरिक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यम आणि कम्युनिकेशन, क्रीडा प्रशिक्षण यामध्ये शिक्षणाच्या संधी युवकांना मिळतील.