अखेर 'त्या' बिबट्याने घेतला शेवटचा श्वास; सुपर स्पेशालिटी पशू दवाखाना कधी होणार?
By साहेबराव हिवराळे | Published: September 5, 2022 11:35 AM2022-09-05T11:35:32+5:302022-09-05T11:36:22+5:30
वन्य जिवांच्या संवर्धनासाठी वनविभाग सातत्याने प्रयत्न करीत असला तरी त्यांच्याकडे आधुनिक साधनांचा अभाव आहे.
औरंगाबाद : गेल्या रविवारी बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या त्या बिबट्याचा रविवारी अखेर अंत झाला. सातत्याने प्रयत्न करूनही शनिवारी बिघडलेल्या परिस्थितीतून अखेर त्याला बाहेर पडता आले नाही. पशुवैद्यकीय पथक शवविच्छेदन करणार असून मृत्यूचे कारण त्यातून कळणार आहे.
येथे सुपर स्पेशालिटी आधुनिक पशू दवाखाना मंजूर असला तरी ते प्रत्यक्षात कधी होणार, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. मराठवाडा परिसरामध्ये बिबट्यांची संख्या वाढली आहे. वन्य जिवांच्या संवर्धनासाठी वनविभाग सातत्याने प्रयत्न करीत असला तरी त्यांच्याकडे आधुनिक साधनांचा अभाव आहे. दोन ते तीन वर्षांच्या कालावधीमध्ये १९ बिबट्यांनी आतापर्यंत जीव गमावलेला आहे. पिंजऱ्याची क्षमता गैरसोयीची असून संसर्ग होऊ नये म्हणून लागणारी साधन सामुग्री वनविभागाने उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. दौलताबाद येथील नर्सरीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात वन्य जिवांवर उपचार केला जातो. अचानक उद्भवलेल्या प्रसंगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम काम करते, परंतु सुपर स्पेशालिटी सर्व सोयीयुक्त सुसज्ज असा दवाखाना नसल्यामुळे मर्यादा पडतात.
गोचीड ताप बिबट्याच्या मृत्यूचे कारण ठरला की अन्य काही, याविषयी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन केल्यानंतर अहवालातून नेमके कारण समजेल, असे सहायक आयुक्त डॉ. गायकवाड, डॉ. रोहित धुमाळ यांनी सांगितले. वनविभागाचे उपमुख्य संरक्षक मंकावार, वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब तौर,वनपरिक्षेत्राधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
फॉरेन्सिकला पाठवणार व्हिसेरा
बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्याचा मृत्यू गोचीड तापानेच झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या नमूद असून व्हिसेरा फॉरेन्सिकला तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.
अजून किती मरणार...?
पाचोड, थेरगाव, करमाड, चिकलठाणा, सोयगाव, कन्नड, वैजापूर, पळशी, अंबड, अजिंठा या भागांत चौदा बिबट्या दगावले आहेत. अशा एकूण १९ पेक्षा अधिक बिबट्यांवर जीव गमावण्याची वेळ आली आहे. संबंधित योग्य उपाययोजना कधी करणार, असा सवाल वन्यजीव अभ्यासक आदी गुंठे यांनी उपस्थित केला आहे.
भुकेल्या अवस्थेत सापडलेल्या बिबट्याची जगण्याची उमेद निर्माण झाली होती. परंतु शनिवारी सकाळी तब्येत खालावली. अखेर पशुवैद्यकीय चमूच्या प्रयत्नांवर पाणी फिरले.
- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव सदस्य