अखेर अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडमध्ये एमआयडीसीला शासनाची मंजूरी
By बापू सोळुंके | Published: April 10, 2023 06:59 PM2023-04-10T18:59:04+5:302023-04-10T18:59:44+5:30
सिल्लोड एमआयडीसीकरीता ३७५ एकर जमिनीचे भूसंपादन होणार
छत्रपती संभाजीनगर: सिल्लोड येथे प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या मागणीला यश आले आहे. पहिल्या टप्प्यात केवळ शासकीय गायरान जमिनीवर एमआयडीसी विकसित करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाने घेतला. यांतर्गत सिल्लोड जवळील रजाळवाडी, मोंढा बुद्रूक , मंगरूळ व डोंगरगाव येथील ३७५एकर (१५० हेक्टर) शासकीय जमिनीवर एमआयडीसी उभारण्यास महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने(एमआयडीसी) नुकतीच मंजूरी देण्यात आली आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी हा विशेष उद्योगमंत्र्याकडे लावून धरला होता. त्यांच्या या मागणीला यश आले आहे. सिल्लोड येथे पहिल्या टप्प्यात १५० हेक्टरवर औद्योगिक वसाहत उभारण्यास मंजूरी दिली आहे. सिल्लोड जवळील रजाळवाडी, मोंढा बुद्रूक, मंगरूळ आणि डोंगरगाव येथील सरकारी गायरान जमिनीची यासाठी निवड करण्यात आली आहे. सिल्लोड येथे एमआयडीसीची मागणी पुढे आल्यानंतर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सिल्लोड येथील शासकीय आणि खाजगी जमिनीची पहाणी केली.
यानंतर एमआयडीसीचे सीईओ आणि अन्य अधिकाऱ्यांनीही सिल्लोड येथे जाऊन जमिनीची पहाणी केल्यानंतर शासनास सविस्तर अहवाल दिला होता. सुरवातीला एक हजार एकरवर एमआयडीसी उभारण्याची मागणी पुढे आली होती.मात्र जिल्ह्यातील शेंद्रा, बिडकिन डिएमआयडीसीमध्ये पंचतारांकित सुविधा असलेले औद्योगिक भूखंड शिल्लक असताना सिल्लोड येथे उद्योजक उद्योग उभारण्यासाठी भूखंड खरेदी करतील का, याबाबत सांशकता एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना आहे. तेव्हा पहिल्या टप्प्यात केवळ शासकीय जमिनीवर एमआयडीसी उभत्तरण्यात यावी,या भूखंडांवर उद्योग उभे राहिले तर मागणीनुसार दुसऱ्या टप्प्यात खाजगी जमिनीचे भूसंपादन करावे अशी, सूचना करण्यात आली होती. दरम्यान नुकतीच राज्यशासनाच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत सिल्लोड येथे १५०हेक्टर सरकारी जमिनीवर भूखंड उभारण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी रजाळवाडी, मोढा, मंगरूळ आणि डोंगरगाव येथील शासकीय जमिनीचे भूसंपादन करण्यास मंजूरी दे्ण्यात आली.
जिल्ह्यात सातवी एमआयडीसी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आधीच वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा पंचतारांकित, रेल्वेस्टेशन, पैठण आणि बिडकीन आदी ठिकाणी एमआयडीसी कार्यरत आहेत. आता सिल्लोड येथे औद्योगिक वसाहतीला मंजूरी मिळाल्याने ग्रामीण भागातही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. मागील २० वर्षापासून प्रलंबित वैजापूर येथील एमआयडीसी तातडीने मार्गी लागावी, यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहे.