अखेर घाटी दवाखान्यातील सुपर स्पेशालिटी विभागात होणार दीड महिन्यात नोकर भरती

By प्रभुदास पाटोळे | Published: July 7, 2023 12:20 PM2023-07-07T12:20:13+5:302023-07-07T12:20:55+5:30

गरीब रुग्णांवर खासगी दवाखान्याप्रमाणे विशेष शस्त्रक्रिया होण्याचा मार्ग होणार मोकळा

Finally, the recruitment of super specialty department of Ghati Hospital will be done in one and a half months | अखेर घाटी दवाखान्यातील सुपर स्पेशालिटी विभागात होणार दीड महिन्यात नोकर भरती

अखेर घाटी दवाखान्यातील सुपर स्पेशालिटी विभागात होणार दीड महिन्यात नोकर भरती

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (घाटी) सुपर स्पेशालिटी विभागातील ७२ परिचारिका आणि ५ तंत्रज्ञांची ४५ दिवसात भरती करण्याचे निवेदन खंडपीठात उपस्थित असलेले वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या संमतीने देण्यात आले. त्यांच्या निवेदनानुसार ४५ दिवसात वरीलप्रमाणे नोकर भरती करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी शासनास दिले.

त्याचप्रमाणे औरंगाबादसह राज्यातील इतर जिल्हा परिषदांतर्गतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील प्रत्येकी ३ पदे भरतीबाबत ३१ जुलैला जाहीरात देण्याचेही आदेश खंडपीठाने दिले. यात औरंगाबाद जिल्ह्यातील कुंजखेडा, कन्नड, गेवराई (शे. मी), सिल्लोड, रिधोना, टाकळी कोलते, फुलंब्री, तोंडोळी, पैठण आणि गांधेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील नोकर भरतीचाही अंतर्भाव आहे.

सुनावणीदरम्यान खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा निदर्शनास आणून दिले की, १५० कोटी रुपये खर्चून घाटी रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी विभागाची इमारत बांधण्यात आली. तेथे ३० कोटी रुपयांची अत्याधुनिक यंत्रसामग्री आणली गेली. विविध विभागांत तज्ज्ञ डॉक्टरही उपलब्ध आहेत. केवळ या विभागातील ७२ परिचारिका आणि ५ तंत्रज्ञांच्या नियुक्त्या झाल्या नसल्यामुळे रुग्णाला जीवदान देणाऱ्या महागड्या शस्त्रक्रियांपासून गरीब रुग्ण वंचित राहिले आहेत. शासनाने यापूर्वी नंदुरबार आणि सिंधुदुर्ग येथील शासकीय दवाखान्यातील नोकर भरतीसाठी विशेष अधिसूचना काढली होती. त्याचप्रमाणे येथील सुपर स्पेशालिटी विभागातील नियुक्त्यांबाबत स्वतंत्र आदेश देण्याची विनंती खा. जलील यांनी केली. त्यावरून संचालकांच्या निवेदनानुसार खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

संचालकांची बिनशर्त माफी; ३३ डॉक्टरांच्या बदल्यांचा आदेश मागे
इतर जिल्ह्यांतील डॉक्टर्सच्या तात्पुरत्या बदल्या करण्यास औरंगाबाद खंडपीठाने २० एप्रिल २०२३ रोजी स्थगिती दिली होती. असे असताना राज्याचे वैद्यकीय संचालक डॉ. म्हैसेकर यांनी ९ मे २०२३ रोजी इतर वैद्यकीय महाविद्यालयांतील ३३ डॉक्टर्सच्या परभणीला तात्पुरत्या बदल्या केल्याचे खासदार जलील यांनी यापूर्वीच्या सुनावणीवेळी निदर्शनास आणून दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नसल्यामुळे ‘अवमानाची कारवाई का करू नये?’ अशी कारणेदर्शक नोटीस डॉ. म्हैसेकर यांना बजावण्यात आली होती. त्यानुसार डॉ. म्हैसेकर यांनी हजर होऊन बिनशर्त माफी मागितली. तसेच ३३ डॉक्टरांच्या बदल्यांचा आदेश मागे घेतला. आजच्या सुनावणीवेळी घाटीचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोडही उपस्थित होते.

Web Title: Finally, the recruitment of super specialty department of Ghati Hospital will be done in one and a half months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.