अखेर मुहूर्त लागला, शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम सुरू होणार; जाणून घ्या पर्यायी मार्ग
By सुमित डोळे | Published: October 14, 2023 05:31 PM2023-10-14T17:31:13+5:302023-10-14T17:32:11+5:30
पुढील एक वर्षासाठी शिवाजीनगर गेट बंद राहणार; नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या बांधकामाला मुहूर्त लागला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये याचे काम सुरू होणार असून त्यासाठी पुढील एक वर्षासाठी शिवाजीनगर गेट बंद राहणार आहे. वाहतूक पोलिस विभागाने शनिवारी दुपारी यासंदर्भाने नोटिफिकेशन जारी केले.
गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम रखडले होते. वेगाने वाढलेल्या देवळाई-साताऱ्यातील नागरिकांना रोज या ठिकाणी रेल्वे गेट ओलांडून जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. रेल्वे आल्यानंतर गेट बंद झाल्यावर येथे वाहतूकीची मोठी कोंडी होत होती. वारंवार मागणीनंतर एक वर्षापुर्वी तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी १७ जून विशेष भूसंपादन विभागाला शिवाजीनगर रेल्वे गेट भुयारी मार्गासाठी भूसंपादन करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात भुयारी मार्गात अडथळा ठरणाऱ्या मालमत्तांच्या मुल्यांकनांसाठी सरकारने मंजुरी दिली. त्यानंतर आता जागतिक बँक प्रकल विभागाकडून नुकतेच काम सुरू करण्यासंदर्भाने पोलिसांना पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर वाहतूक विभागाने पाहणी करुन गेट क्रमांक ५५ ची वाहतूक १५ ऑक्टोबर २०२३ ते १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांनी केले आहे.
असा असेल पर्यायी मार्ग:
-देवळाई चौक ते गोदावरी टी मार्गे संग्रामनगर उड्डानपुलावरुन जातील व येतील.
-देवळाई चौक ते गोदावरी टी पॉईंट,एमआयटी,महानुभव आश्रम चौक, रेल्वेस्थानक मार्गे जातील व येतील.
-देवळाई चौक ते गोदावरी टी मार्गे संग्रामनगर भुयारी मार्गाने शहानुरमिया दर्गा चौकाकडे जातील व येतील.
-देवळाई चौक ते गोदावरी टी,एमआयटी चौक, महुनगर टि पॉईंट मार्गे उस्मानपुऱ्याकडे जातील व येतील.
-शिवाजीनगर,सुतगिरणी चौक ते शहानुरमिया दर्गा चौक मार्गे संग्रामनगर उड्डानपुलावरुन जातील व येतील.
-शिवाजीनगर चौक,धरतीधन सोसायटी,गादीया विहार मार्गे शहानुरमिया गर्दा चौक मार्गे जातील व येतील.