अखेर प्रतीक्षा संपली; बिडकीन डीएमआयसीमध्ये दीड हजार कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 11:52 AM2022-08-08T11:52:28+5:302022-08-08T11:53:25+5:30

कॉस्मो फिल्म आणि पिरॅमल फार्मास्युटिकल कंपन्यांनी घेतली ३११ एकर जमीन

Finally the wait is over; Investment of 1.5 thousand crores in Bidkin DMIC | अखेर प्रतीक्षा संपली; बिडकीन डीएमआयसीमध्ये दीड हजार कोटींची गुंतवणूक

अखेर प्रतीक्षा संपली; बिडकीन डीएमआयसीमध्ये दीड हजार कोटींची गुंतवणूक

googlenewsNext

औरंगाबाद : दिल्ली -मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) बिडकीन औद्योगिक पट्ट्यामध्ये कॉस्मो फिल्म प्रा. लि. आणि पिरॅमल फार्मास्युटिकल या दोन कंपन्या दीड हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी सरसावल्या आहेत. या दोन्ही कंपन्यांनी अनुक्रमे १७८ एकर आणि १३८ एकर जमीन खरेदी केल्याची घोषणा नॅशनल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉरिडॉरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमरितलाल मीना यांनी रविवारी ऑरिक सिटी येथे केली.

डीएमआयसीच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात मोठा उद्योग यावा, यासाठी औरंगाबादचे उद्योगविश्व तीन वर्षांपासून प्रतीक्षेत होते. रविवारी अखेर ही प्रतीक्षा संपुष्टात आली. कॉस्मो फिल्म प्रा. लिमिटेड आणि पिरॅमल फार्मा प्रा. लि. या दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी बिडकीन औद्योगिक पट्ट्याला भेट दिली होती. त्यांना येथील इन्फ्रास्ट्रक्चर आवडल्याने या दोन्ही कंपन्यांनी येथे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. कॉस्मो फिल्मकडून येथे १७८ एकर, तर पिरॅमल फार्मा कंपनीने १३८ एकर अशी एकूण ३११ जमीन खरेदी केली आहे. कॉस्मो फिल्मने विस्तारीकरण करण्यासाठी येथे टप्प्याटप्प्याने सुमारे एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. पिरॅमल फार्माकडून सुमारे ५०० कोटी रुपयांची येथे गुंतवणूक होणार आहे. या दोन्ही कंपन्यांमुळे अनुक्रमे १ हजार ५०० आणि १ हजार २०० असे एकूण २ हजार ७०० लोकांना थेट रोजगार मिळणार असल्याची माहिती डीएमआयसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. दोन्ही कंपन्या डिसेंबर २०२३ पर्यंत त्यांचे उत्पादन सुरू करण्याची शक्यता आहे. या कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे बिडकीन औद्योगिक पट्ट्याला प्रतीक्षेत असलेले अँकर प्रकल्प मिळाल्याने येथे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सुमारे पाच हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

२५ टक्के सवलतीत मिळाली जमीन
बिडकीन औद्योगिक पट्ट्यात मोठी गुंतवणूक असलेला उद्योग यावा, यासाठी केंद्र आणि राज्यसरकारसोबत सीएमआयएचे पदाधिकारी प्रयत्नशील होते. या प्रयत्नांना आता यश आले असून, दोन्ही कंपन्या आता सुमारे दीड हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. या दोन्ही कंपन्यांना २५ टक्के सवलतीनुसार २ हजार ४०० रुपये चौरस मीटर दराने जमीन देण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. या कंपन्यांनी जमिनीच्या एकूण किमतीच्या ५ टक्के रक्कम डीएमआयसीकडे जमा करून प्लॉटची बुकिंग केली आहे.

एनआयडीसीच्या सीईओंची ऑरिक सिटीला भेट
नॅशनल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉरिडॉरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमरितलाल मीना यांनी रविवारी ऑरिक सिटीला भेट दिली. यावेळी त्यांनी ऑरिक सिटीतील आतापर्यंत विक्री झालेले भूखंड, किती उद्याेगांचे उत्पादन सुरू झाले, याविषयीचा आढावा घेतला. तेव्हा त्यांनी बिडकीनमध्ये कॉस्मो फिल्म आणि पिरॅमल फार्मा कंपन्यांनी जमीन घेतल्याचे सांगितले. यावेळी ऑरिक सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, सहव्यवस्थापकीय संचालक जितेंद्र काकुस्ते उपस्थित होते. यावेळी व्यवस्थापक महेश पाटील यांनी ऑरिक सिटीबाबतचे सादरीकरण केले. यानंतर मीना यांनी ह्योसंग कंपनीला भेट दिली.

Web Title: Finally the wait is over; Investment of 1.5 thousand crores in Bidkin DMIC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.