...अखेर वाळूज-कमळापूर रस्त्याचे काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:56 PM2019-06-25T22:56:56+5:302019-06-25T22:57:07+5:30
वाळूज-कमळापूर या रस्त्याचे डांबराअभावी रखडलेले काम मंगळवारपासून सुरू करण्यात आले आहे.
वाळूज महानगर : वाळूज-कमळापूर या रस्त्याचे डांबराअभावी रखडलेले काम मंगळवारपासून सुरू करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे वाहनधारक व नागरिकांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या रस्त्याचे काम सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. वाळूजच्या मुख्य प्रवेशद्वारापासून रामराई चौफुलीपर्यंत या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. रामराई चौफुलीपासून कमळापूरपर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी दोन महिन्यांपूर्वी संबंधित ठेकेदाराने खडी रस्त्यावर अंथरून ठेवली आहे.
दरम्यान, डांबर मिळत नसल्याचे कारण दर्शवून या ठेकेदाराने पंधरा दिवसांपासून या रस्त्याचे काम बंद ठेवले होते. तीन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती.
या रस्त्याचे रखडलेले काम त्वरित सुरू करण्यात यावे, यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या लताताई इले, नामदेव इले आदींसह त्रस्त नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला होता. दरम्यान, मंगळवारपासून रखडलेले रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराकडून सुरू करण्यात आले आहे. पाऊस न पडल्यास जवळपास पंधरा दिवसांत या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे ठेकेदार व्ही.टी. पाटील यांनी सांगितले.