अखेर शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेला सापडला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:33 AM2017-12-18T01:33:21+5:302017-12-18T01:33:25+5:30
ग्रामपंचायत निवडणूक आचार संहितेमुळे तब्बल साडेतीन महिन्यांनंतर जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेला मुहूर्त सापडला आहे. १९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील १४ शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणूक आचार संहितेमुळे तब्बल साडेतीन महिन्यांनंतर जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेला मुहूर्त सापडला आहे. १९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील १४ शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांतील उत्कृष्ट कार्य करणाºया शिक्षकांना दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाते. याही वर्षी शिक्षक दिनापूर्वीच या पुरस्क ारासाठी शिक्षकांकडून प्रस्ताव मागवले होते. तालुकानिहाय दोन या प्रमाणे नऊ तालुक्यांतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांकडून, तर विशेष शिक्षकाच्या एका पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात आले; परंतु प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पुरस्कारासाठी सोयगाव तालुक्यातून एकही प्रस्ताव प्राप्त झाला नाही. विशेष शिक्षक पुरस्कारासाठीही जिल्ह्यातील एकही प्रस्ताव नाही. नऊ माध्यमिक शिक्षक पुरस्कारांपैकी अवघे ६ प्रस्ताव आले असून, यासाठी सिल्लोड व सोयगाव तालुक्यांतून एकही प्रस्ताव आलेला नाही.
जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने प्रस्तावांची छाननी करून यादी अंतिम केली. सदरील यादीला विभागीय आयुक्तांचीही मंजुरी मिळाली; पण ग्रामपंचायत निवडणुकीची आचार संहिता उठली, तरी पुरस्कार वितरण सोहळ्याला मुहूर्त सापडत नव्हता. अखेर शिक्षण सभापती मीनाताई शेळके व डोणगावकर यांनी १९ डिसेंबर रोजी पुरस्कार वितरणाचा समारंभ ठेवण्यास अनुमती दर्शवली. त्यानुसार शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
हे आहेत जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षक
प्राथमिक शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेले औरंगाबाद तालुक्यातील अंकुश इत्थर, पैठण तालुक्यातील चंद्रकांत घोडके, गंगापूर तालुक्यातील बालचंद गोरे, वैजापूर तालुक्यातील प्रभाकर बारसे, कन्नड तालुक्यातील सारिका जांभळे, खुलताबाद तालुक्यातील परमेश्वर गोटे, सिल्लोड तालुक्यातील विजया चापे आणि फुलंब्री तालुक्यातील बाबूराव गाडेकर हे शिक्षक आहेत.
माध्यमिक शिक्षक पुरस्कारासाठी पैठण तालुक्यातील रेणुका माळेवाडीकर, गंगापूर तालुक्यातील लक्ष्मण जावळे, वैजापूर तालुक्यातील अरुण शिंदे, कन्नड तालुक्यातील उदयराम घावरी, खुलताबाद तालुक्यातील वसंतराव राठोड आणि फुलंब्री तालुक्यातील प्रतिभा पाईकराव या सहा शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.