फायनान्स कंपनीला बाईकवर बनावट नंबर टाकून चकवले मात्र सिग्नल तोडल्याने बिंग फुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 06:03 PM2021-03-26T18:03:31+5:302021-03-26T18:06:07+5:30
fake number on the bike पोलिसांनी त्याच्या दुचाकीचा क्रमांक ई चलन मशीनमध्ये टाकला तेव्हा, समोर आले ते त्या मॉडेलची ती दुचाकी नव्हती.
औरंगाबाद : कर्जावर घेतलेल्या मोटारसायकलवर बनावट क्रमांक टाकून फायनान्स कंपनीला हुलकावणी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाचा भंडाफोड झाला.
गुलाब रामभाऊ जोनवाल (वय २३, रा. वरझडी, ता. गंगापूर) असे आरोपीचे नाव आहे. सिडको बसस्थानकाजवळ वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार सुरेश रामभाऊ तारव आणि अन्य कर्मचारी गुरुवारी सकाळी ११:३० वाजता वाहतूक नियमन करीत होते. वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर ते कारवाईही करीत होते. त्यांनी एमएच २० एफबी १४३ क्रमांकाच्या पल्सर मोटारसायकल चालकास हात दाखवून थांबविले. मोटारसायकलस्वार गुलाब जोनवाल याला त्यांनी गाडीची कागदपत्रे दाखविण्यास सांगितले. आरोपीने दुचाकीची कागदपत्रे घरी असल्याचे पोलिसांना सांगितले. दंडाची पावती घ्यायला तयार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी त्याच्या दुचाकीचा क्रमांक ई चलन मशीनमध्ये टाकला तेव्हा, समोर आले ते त्या मॉडेलची ती दुचाकी नव्हती. शिवाय या क्रमांकाच्या दुचाकीचा मालक गणेश जिते असल्याचे मशीन दाखवत होती. पोलिसांनी जाब विचारल्यावर तो घाबरून गेला व पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने त्याच्या दुचाकीचा खरा क्रमांक एमएच २० एफक्यू २०८४ असल्याचे सांगितले. गाडी खरेदी करताना फायनान्स कंपनीचे कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाचे हफ्ते न फेडल्यामुळे फायनान्स कंपनीचे लोक गाडी ओढून नेऊ शकतात. त्यांना हुलकावणी देण्याकरिता ही बनवेगिरी केल्याचे त्याने कबूल केले. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल तारव यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.