फायनान्सचे हप्ते थकले, रिक्षाचालकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:05 AM2021-09-26T04:05:01+5:302021-09-26T04:05:01+5:30
संतोष कडुबा पावसे असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. पावसे यांची पत्नी पित्राच्या कार्यक्रमासाठी शेजाऱ्याकडे गेली होती. या वेळी घरी ...
संतोष कडुबा पावसे असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. पावसे यांची पत्नी पित्राच्या कार्यक्रमासाठी शेजाऱ्याकडे गेली होती. या वेळी घरी असलेले पावसे हे वरच्या मजल्यावरील खोलीत गेले आणि त्यांनी गळफास घेतला. काही वेळाने त्यांची पत्नी घरी परतली तेव्हा त्यांना ही घटना दिसली. याविषयी त्यांनी मुकुंदवाडी पोलिसांना कळविले. पोलिसांनी संतोष यांना बेशुद्धावस्थेत घाटीत हलविले. डॉक्टरांनी संतोष यांना तपासून मृत घोषित केले.
मृताच्या नातेवाइकांनी सांगितले की, संतोष यांनी दादा कॉलनी येथील परमिटधारकासोबत करार करून ऑटो रिक्षा खरेदी केली होती. यासाठी त्यांनी खासगी कंपनीकडून कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाचे हप्ते फेडणे होत नसल्याने त्यांनी काही महिन्यांपूर्वी रिक्षा परमिटधारकाला विकली. हा व्यवहार करताना कर्जाचे हप्ते फेडण्यासंदर्भात त्यांच्यात करार झाला होता; परंतु कराराप्रमाणे पुढील हप्ते न भरण्यात आल्याने फायनान्स कंपनीचे लोक त्यांच्या दारात येऊन गेले होते. याशिवाय रिक्षा खरेदी करणारेही त्यांच्यासोबत भांडत होते. यातूनच त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे नातेवाइकांनी सांगितले. या घटनेची नोंद मुकुंदवाडी ठाण्यात करण्यात आली.