एसटी कर्मचाऱ्यांची १७ महिन्यांपासून आर्थिक कोंडी; पत्नींच्या हाती आली संसाराची गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:33 PM2021-08-26T16:33:01+5:302021-08-26T16:38:55+5:30

ऑगस्ट महिना अर्धा संपला, मात्र एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन झालेले नाही.

Financial dilemma of ST employees; The wheel of the home came in the hands of the wives | एसटी कर्मचाऱ्यांची १७ महिन्यांपासून आर्थिक कोंडी; पत्नींच्या हाती आली संसाराची गाडी

एसटी कर्मचाऱ्यांची १७ महिन्यांपासून आर्थिक कोंडी; पत्नींच्या हाती आली संसाराची गाडी

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यभरातील ९७ हजार एसटी कर्मचाऱ्यांची १७ महिन्यांपासून आर्थिक कोंडी झाली आहेवेतन खूपच कमी असल्याने अजून काही दिवस वेतन मिळाले नाही तर उपासमार होईल

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : नाव सुवर्णा भाऊसाहेब ताठे, शिवणकाम आणि जनरल स्टोअर्सच्या माध्यमातून चार पैसे मिळवून संसाराचा गाडा ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर आणखी एक नाव म्हणजे प्रियंका अभिषेक जाधव. याही शिवणकाम करून किमान घरभाडे, महिन्याचा किराणा होईल इतके उत्पन्न मिळवीत आहेत. दोघींचे पती एसटी महामंडळाचे कर्मचारी. ही काही एखाद, दुसऱ्याची स्थिती नाही, तर कोरोना काळात वेळेवर वेतन होत नसल्याने आता अनेक चालक-वाहक आणि कर्मचाऱ्यांच्या पत्नी संसाराचे ‘स्टिअरिंग’ सांभाळत आहे. ( Financial dilemma of ST employees; The wheel of the home came in the hands of the wives) 

ऑगस्ट महिना अर्धा संपला, मात्र एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन झालेले नाही. राज्यभरातील ९७ हजार, तर औरंगाबाद जिल्ह्यातील २ हजार ९०० कर्मचारी वेतनाविना आहेत. वेतनाअभावी कोणाचे घरभाडे थकले आहे, तर कोणाकडे किराणा दुकानदारांची थकबाकी वाढत आहे. कोरोना काळात गेल्या १७ महिन्यांपासून वारंवार वेतन विलंबाला सामोरे जावे लागत आहे. या स्थितीमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पत्नी शिवणकामासह विविध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळविण्यासाठी उभ्या राहिल्या आहेत. वेतन वेळेवर मिळत नसल्याने अनेक महिलांनी कंपन्यांमध्ये नोकरी स्वीकारली आहे.

१७ महिन्यांत वेतनाला वारंवार विलंब
कोरोनापूर्वी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कधीही विलंब झाला नाही. मात्र, कोरोना प्रादुर्भावात एसटीचे उत्पन्न घटले आणि त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर झाला. वर्ष २०२० मध्ये कर्मचारी सलग ३ महिने वेतनाविना होते, तर त्यानंतर प्रत्येक महिन्याला वेतनाला उशीर होत असल्याची स्थिती आहे.

महिन्याला ८ हजार रुपये उत्पन्न
माझे पती एसटी महामंडळात वाहक असून, लाॅकडाऊन लागण्याअगोदर पगार वेळेवर व्हायचा; परंतु आता पगार वेळेवर होत नाही. यामुळे थोडी अडचण येते. सध्या मी चालवीत असलेल्या शिलाई मशीन व जनरल स्टोअर्समुळे महिन्याकाठी ७ ते ८ हजार रुपये मिळतात. त्यातून घर चालत आहे.
- सुवर्णा भाऊसाहेब ताठे, औरंगाबाद

कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
एसटी कामगारांचे वेतन खूपच कमी असल्याने अजून काही दिवस वेतन मिळाले नाही तर कर्मचाऱ्यांची उपासमार होईल. वेतनावर जीवन जगणे कर्मचाऱ्यांना कठीण होत आहे. कोणाचे घरभाडे थकले आहे, तर कोणाचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. सरकारने मदत केल्याशिवाय वेतन होणार नाही. सरकारकडे ६०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. वेतन तत्काळ मिळण्यासाठी सरकारने आर्थिक साहाय्य करावे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांची संख्या
- चालक : ३४,०००
- वाहक : ३१,०००
- अन्य : ३२, ०००

Web Title: Financial dilemma of ST employees; The wheel of the home came in the hands of the wives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.