भारीच! शाळेत आर्थिक साक्षरतेचे धडे; विद्यार्थ्यांनी उभारलेल्या आनंदनगरीत ६० हजारांची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 05:30 PM2024-01-06T17:30:26+5:302024-01-06T17:33:52+5:30
विद्यार्थ्यांनी उभारलेल्या २०० स्टॉलवर विद्यार्थी, पालक अन् शिक्षकांनी शॉपिंगसोबत घेतला विविध पदार्थांचा आस्वाद
फुलंब्री : विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी उभारलेल्या आनंदनगरीत धम्माल मस्ती सोबत आर्थिक धडेही घेतले. शहरातील ओयसीस इंग्रजी शाळेत शनिवारी आंनद नगरी (फ़ूड मेला) आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे यात स्वतः विद्यार्थ्यांनी २०० स्टॉल उभारले होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शाळेतच आर्थिक साक्षरतेचे धडे मिळाले असून तब्बल ६० हजार रुपयांची उलाढाल झाली आहे.
या आनंद नगरीमध्ये नर्सरी पासून बारावीपर्यंत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये अनेक प्रकारची स्टॉल विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने उभारले होते. यात खेळणी, फळे, रोपटे, पाणीपुरी, भेळपुरी, इडली, समोसा ,डोसा ,चहा, छोले भठूरे, गुलाबजामून, भाजीपाला, पेरू, काकड़ी, चॉकलेट स्टॉल, पापड़ स्टॉल समावेश होता.
चिमुकल्यांच्या तब्बल दोनशे स्टॉलला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्टॉलमध्ये विद्यार्थ्यांनीच नव्हे तर पालकांनी सुद्धा मनसोक्त आनंद लुटत शॉपिंग करत विविध पदार्थांची चव चाखली. विशेष म्हणजे, या सर्व स्टॉलमधून ६० हजार रुपयांची उलाढाल झाली. दैनदीन आर्थिक व्यवहाराची माहिती या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र वाघ यांनी दिली. या उपक्रमात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात चत्तरसिंग राजपुत, स्वरूप राजपूत, राहुल ठाकूर, प्राचार्या करुणा दांडगे, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग घेतला.