लॉकडाऊनमध्ये पोस्ट बँकेकडून आर्थिक आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:33 AM2020-12-17T04:33:08+5:302020-12-17T04:33:08+5:30
औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात भारतीय डाक विभागाने ५ हजार लोकांच्या घरी जाऊन अडीच कोटी रुपये वाटप केले. याच काळात ...
औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात भारतीय डाक विभागाने ५ हजार लोकांच्या घरी जाऊन अडीच कोटी रुपये वाटप केले.
याच काळात बँकेच्या सेव्हिंग खात्यात २०४ कोटींचे व्यवहार झाले.
कोरोनाच्या संसर्ग वाढू नाही म्हणून देशात लॉकडाऊन लावण्यात आले होते. एप्रिल ते ऑगस्ट या अत्यंत कठीण काळात भारतीय डाक विभागातील कर्मचारी कोविड योद्ध्याप्रमाणे जनतेची सेवा करीत होते. एकीकडे बँक सेवा देत होत्या; पण लोकांना घराबाहेर पडता येत नव्हते. भारतीय डाक विभागांतर्गत इंडियन पोस्ट पेमेन्टस् बँकअंतर्गत पोस्टमनने औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील ५ हजार लोकांच्या घरी जाऊन अडीच कोटी रुपयांचे पेमेंट केले. त्या लोकांचे अन्य कोणत्याही बँकेत अकाउंट असले तरी त्यांना त्यांच्या खात्यातील रक्कम घरी नेऊन देत त्यांची आर्थिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला.
पोस्ट पेमेन्टस् बँकेत या काळात सेव्हिंग खात्यात १ लाख ७० हजार वेळ व्यवहार झाले. त्याद्वारे लोकांनी २०४ कोटी रुपयांचे व्यवहार केले.
याशिवाय एक हजार लोकांनी मनीऑर्डर केल्या. यामुळे बँकिंग व्यवहार करण्यासाठी लोकांना बँकेत जावे लागले नाही. उन्हा-पावसात रांगेत उभे राहावे लागले नाही. लोकांना बँकेतील रक्कम थेट त्यांच्या घरी नेऊन देण्यासाठी ६५७ पोस्टमन व ग्रामीण पोस्ट सेवकांनी आपली सेवा बजावली.
चौकट
दीड हजार लोकांना घरपोच औषधी
लॉकडाऊनच्या काळात पोस्ट खात्याने मनीऑर्डर, घरपोच रक्कम देण्याचे काम तर केलेच. याशिवाय याच काळात १,५०० लोकांना औषधी व अत्यावश्यक वस्तू नेऊन दिल्या. या सेवेचा ज्येष्ठ नागरिकांना जास्त फायदा झाला.
चौकट
अडीच हजार विद्यार्थ्यांनी उघडली खाती
लॉकडाऊनच्या काळात इंडियन पोस्ट पेमेन्टस् बँकेत अडीच हजार विद्यार्थ्यांनी खाती उघडली. शिष्यवृत्तीसाठी ही खाती उघडण्यात आली.
चौकट
पोस्ट विभागाने निर्माण केला आदर्श
कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आले असताना पोस्ट विभागाचे कर्मचारी जनतेला घरपोच सेवा देत होते. कोविड योद्ध्याचे काम आमच्या पोस्टमन, ग्रामीण पोस्ट सेवक व अन्य कर्मचाऱ्यांनी केले. यामुळेच औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील ४७ कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामाबद्दल कोरोना योद्ध्याचा पुरस्कार मिळाला.
-जि. शिव. नागराजू,
प्रवर अधीक्षक डाक विभाग