मराठवाड्यात टंचाईग्रस्त भागांना पाणी देण्यासाठी पर्याय शोधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:04 AM2021-07-21T04:04:22+5:302021-07-21T04:04:22+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील पाण्याची तीव्र टंचाई भासणाऱ्या जिल्ह्यांचा, तालुक्यांचा व इतर भागांचा अभ्यास करावा. त्या भागांना पाणी देण्यासाठीचे पर्याय ...
औरंगाबाद : मराठवाड्यातील पाण्याची तीव्र टंचाई भासणाऱ्या जिल्ह्यांचा, तालुक्यांचा व इतर भागांचा अभ्यास करावा. त्या भागांना पाणी देण्यासाठीचे पर्याय शोधावेत, असे आदेश राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सिल्लोड तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांबाबत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समवेत मंत्रालय येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत भराडी बृहत लघु पाटबंधारेसंदर्भात सर्वेक्षणाचे काम लवकर पूर्ण करावे, असे आदेश पाटील यांनी दिले. या बैठकीत विभागातील पाणीटंचाईच्या अनुषंगाने चर्चा झाली. मराठवाड्यात सध्या बहुतांश धरणांत कमी प्रमाणात पाणीसाठा आहे. अर्धा पावसाळा संपला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विभागात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जलसंपदा खात्यात मंगळवारी झालेल्या बैठकीत पश्चिम नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबतही चर्चा झाली. ते पाणी गोदावरी खोऱ्यातून विभागाकडे वळविले तर बहुतांश परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. या योजनेसाठी कागदोपत्री अहवाल तयार झाला असून, याबाबत तांत्रिक माहितीचे संकलन झाले आहे.