इंटरनेटवरून रुग्णालयाचा संपर्क क्रमांक शोधणे पडले महागात; बँकखात्यातून अडीच लाख लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 08:40 PM2023-06-06T20:40:32+5:302023-06-06T20:40:51+5:30
तुमचा रुग्णालयात क्रमांक लागला असून तुम्हाला एक लिंक पाठवली आहे, त्यावर रुग्णाचे नाव नोंदववा म्हणून कॉल आला...
छत्रपती संभाजीनगर : आजारी मुलीला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णालयाचा ऑनलाईन क्रमांक शोधून संपर्क करणे ४४ वर्षीय विजय सोनवणे यांना चांगलेच महागात पडले. इंटरनेटवर सर्च केलेला पहिलाच क्रमांक सायबर गुन्हेगारांचा निघाला. रुग्णालयाकडून बोलत असल्याचे सांगून त्यांनी सोनवणे यांना लिंक पाठवत त्यांच्या बँक खात्यातून २ लाख ४४ हजार ९९६ रुपये लंपास केले. याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
पडेगाव परिसरात राहणारे सोनवणे यांची मुलगी हिमांशू एप्रिल महिन्यात आजारी पडली हाेती. तिला रुग्णालयात नेण्यासाठी त्यांनी उस्मानपुऱ्यातील रुग्णालयाचा इंटरनेटवर क्रमांक शोधून संपर्क साधला. काही वेळाने त्यांना अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. 'तुमचा रुग्णालयात क्रमांक लागला असून तुम्हाला एक लिंक पाठवली आहे, त्यावर रुग्णाचे नाव नोंदवून दहा रुपये शुल्क ऑनलाईन पाठवा' असे कॉलवरील व्यक्तीने त्यांना सांगितले. त्यानंतर सोनवणे यांना लिंक प्राप्त झाली. सोनवणे यांनी विश्वास ठेवत त्यावर सर्व तपशील लिहून लिंकवरील स्कॅनरवर दहा रुपये पाठवले.
तीन दिवस पैसे जात गेले
सोनवणे यांनी दहा रुपये पाठवताच त्यांना आरोपींनी ओटीपी पाठवून तो सांगण्यास सांगितले. सोनवणे यांनी विश्वासाने तो त्यांना सांगताच पहिल्या दिवशी त्यांच्या खात्यातून ९९ हजार ९९८ रुपये वळते झाले. त्यानंतर पुढील दोन दिवसांत सायबर गुन्हेगारांनी एकूण २ लाख ४४ हजार ९९६ रुपये ढापले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यावरून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक कैलास देशमाने तपास करत आहेत.