‘गगन’मुळे जवळच्या हवाई मार्गांचा शोध
By Admin | Published: May 25, 2016 11:50 PM2016-05-25T23:50:38+5:302016-05-26T00:05:03+5:30
औरंगाबाद : भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि इस्त्रो या दोन्ही संस्थांनी मिळून गगन (जीपीएस जिओ आॅगमेंटेड नेव्हिगेशन) ही स्वदेशी बनावटीची नेव्हिगेशन प्रणाली तयार केली आहे
औरंगाबाद : देशातील विमानसेवा अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि इस्त्रो या दोन्ही संस्थांनी मिळून गगन (जीपीएस जिओ आॅगमेंटेड नेव्हिगेशन) ही स्वदेशी बनावटीची नेव्हिगेशन प्रणाली तयार केली आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात पोहोचण्यासाठी जुन्या प्रणालीत बराच वेळ लागतो; परंतु गगन प्रणालीमुळे जवळचा हवाई मार्ग शोधणे शक्य झाल्याने इंधनाची मोठी बचत होण्यास मदत होते, असे एव्हिएशन सेफ्टीचे संचालक एस. व्ही. सतीश यांनी सांगितले.
विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थापन यंत्रणेविषयी तीनदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा बुधवारी समारोप झाला. याप्रसंगी एस. व्ही. सतीश यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय, उपमहाप्रबंधक शरद येवले, वरिष्ठ प्रबंधक (इलेक्ट्रिकल) अमिताभ रुंगटा, सहायक प्रबंधक (एचआर) सुरेश महंती, पूजा मूल, जी. चंद्रशेखर, सी. कबाडी आदींची उपस्थिती होती. यावेळी एस. व्ही. सतीश यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
ते म्हणाले, भारतात २००३ पासून गगन प्रणालीवर काम सुरू आहे. २०१३ मध्ये ही प्रणाली विकसित करण्यात आली. यासाठी इस्त्रोने तीन उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. अमेरिकेच्या जीपीएस प्रणालीपेक्षा गगन ही प्रणाली २० पटींनी अधिक स्पष्ट असणारी प्रणाली आहे. सध्या देशातील १५ विमानतळ गगन प्रणालीने सज्ज आहेत. या प्रणालीचा वापर वनक्षेत्राचे सर्वेक्षण, रेल्वे क्रॉसिंग यासह इतरही क्षेत्रांतही सुरू आहे.