फिर्यादीनेच चोरीला गेलेले सामान दिले शोधून; त्यानंतरही जप्त करण्यास पोलिसांची टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 06:57 PM2022-07-09T18:57:51+5:302022-07-09T18:58:17+5:30

आठ महिन्यानंतर उचलले पाऊल

Finding the plaintiff gave the stolen goods; Police avoid seizure | फिर्यादीनेच चोरीला गेलेले सामान दिले शोधून; त्यानंतरही जप्त करण्यास पोलिसांची टाळाटाळ

फिर्यादीनेच चोरीला गेलेले सामान दिले शोधून; त्यानंतरही जप्त करण्यास पोलिसांची टाळाटाळ

googlenewsNext

औरंगाबाद : राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तीने भाडेकरु जीम व्यावसायिकाचे तब्बल ३६ लाख १५ हजार ८३५ रुपयांचे सामान चोरुन नेले होते. याप्रकरणी २० नोव्हेंबर २०२१ रोजी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी याप्रकरणी आठ महिन्यानंतर गुरुवारी रात्री आरोपीच्या घरातून किरकोळ साहित्य जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. हे साहित्य ही फिर्यादीने दाखवून दिल्याचे समोर आले आहे.

पुंडलिकनगर ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार शीला पानझाडे यांनी आरोपी सुमीत शिवकिशोर त्रिवेदी (रा. कांचनवाडी) याच्या मालकीच्या गजानन महाराज मंदिर परिसरातील ओम शिवसाई टॉवर येथे ९ जून २०१४ रोजी व्यावसायिक जीम टाकली होती. यासाठी पानझाडे या त्रिवेदीला ७५ हजार रुपये दरमहा भाडे देत होत्या. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर काही महिन्यांनी सुमीतने भरभराटीला आलेल्या जीम व्यवसायात पार्टनर होण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र, त्यास पानझाडे यांनी नकार दिल्यानंतर त्याने त्रास देण्यास सुरुवात केली.

वीज कट करणे, जीमच्या छताची दुरुस्ती न करणे. जीमच्या छताच्या दुरुस्तीसाठी पानझाडे यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यास त्यांनी नकार दिल्यानंतर त्याने जीमलाच टाळे ठोकले. तसेच ९ ते २५ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत त्याने जीम मधील सर्व साहित्य लंपास केले. यानंतर प्रकरण पोलिसात पोहचल्यानंतर त्याने अनेकवेळा साहित्याचे ३० लाख रुपये परत करण्याचा वादा केला. परंतु त्याने पैसे दिले नाहीत. शेवटी २० नोव्हेंबर २०२१ रोजी ३६ लाख १५ हजार ८३५ रुपयांचे साहित्य चोरुन नेल्याचा गुन्हा सुमीत त्रिवेदी यांच्या विरोधात नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा तपास सपोनि. शेषराव खटाणे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. गुन्हा नोंदविल्यानंतर फिर्यादीने जीमचे साहित्य आरोपीच्या घरात, सद्गुरू शिवानंद लॉन्स नक्षत्रवाडीसह इतर ठिकाणी ठेवल्याचे पोलिसांना कळविले. मात्र, त्याकडे पोलिसांनी वारंवार दुर्लक्ष केल्याचा आरोपीही फिर्यादीने केला. गुरुवारी दिवसभर फिर्यादी ठाण्यात बसूनच राहिल्यामुळे अखेर पोलिसांच्या पथकाने त्रिवेदीच्या नक्षत्रवाडीतील लॉनची तपासणी केली. तेव्हा त्याठिकाणी जीम मधील तीन एसी, टेबल, खुर्च्या आदी साहित्य आढळून आल्याचे स्पष्ट झाले.

स्वत:च्या घरात लावल्या एसी
जिममधील चोरून नेलेल्या एसी स्वत:च्या घरात लावल्याचेही स्पष्ट झाले. पोलिसांनी तीन एसी जप्त केल्या आहेत. उर्वरित एसीही दुसऱ्या घरात असल्याचा दावा फिर्यादींनी केला. मात्र, पोलिसांनी एकाच ठिकाणी पाहणी केली. उर्वरित ठिकाणी पाहणी केली नसल्याचेही फिर्यादींनी स्पष्ट केले. तसेच जिममधील इतर साहित्यही शहरातील इतर जिम व्यावसायिकांना विकले आहे. त्याची माहितीही फिर्यादींनी पोलिसांनी दिली असून, त्यावरही काही कार्यवाही होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

आरोपी पक्षाशी संबंधित
आरोपी सुमित त्रिवेदीने नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्याने नक्षत्रवाडी भागातून महापालिकेची निवडणूक लढविण्याची तयारी केली असल्याचेही चौकशीत समोर आले आहे. पोलिसांच्या तपासातील धिम्या गतीमुळे आरोपीला अटकपूर्ण अंतरिम जामीनही मिळाला आहे.

साहित्य जप्त केले जाईल 
खून जुने प्रकरण आहे. फिर्यादीसह आरोपीच्या एकमेकांच्या विरोधात विविध तक्रारी आहेत. न्यायालयातही अर्ज दाखल केलेले आहेत. पोलिसांनी उर्वरित साहित्याची माहिती मिळाल्यास तेसुद्धा जप्त केले जाईल.
- दिलीप गांगुर्डे, निरीक्षक, पुंडलिकनगर ठाणे.

Web Title: Finding the plaintiff gave the stolen goods; Police avoid seizure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.