शासकीय कार्यालयांमध्ये घाण दिसल्यास १० हजार रुपयांचा दंड; मनपा करणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 06:53 PM2024-08-17T18:53:45+5:302024-08-17T18:56:23+5:30
महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलिसांचा संयुक्त निर्णय
छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये सामान अस्ताव्यस्त पडलेले असते. जिकडे बघितले तिकडे धूळ, फायलींचे गठ्ठे असे विदारक चित्र पाहायला मिळते. आता कार्यालये साफ नसल्यास दहा हजार रुपये दंड लावण्यात येईल. दंडाची रक्कम कार्यालय प्रमुखाला खिशातून द्यावी लागेल. महापालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे हा निर्णय घेतल्याची माहिती मनपा प्रशासकांनी दिली.
महापालिकेने १ ते १५ ऑगस्टपर्यंत शहरात स्वच्छता अभियान राबविले. १ हजार टन सुका-ओला कचरा उचलला. विविध, संस्था, संघटनांनी या महास्वच्छता अभियानात सहभाग घेतला. महापालिका मुख्यालयातही स्वच्छता अभियान राबविले. ज्या विभागात उणीव दिसून आली तेथे २१ जणांना आर्थिक दंड लावला. सर्वोत्कृष्ट विभाग म्हणून लेखा व वित्त विभागाने बाजी मारली. द्वितीय क्रमांक लेखापरिक्षण, तृतीय क्रमांक विद्युत विभागाला मिळाला. त्यानंतर ही मोहीम आता शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये राबविली जाईल. भिंतीवरील पिचकाऱ्या, लोखंडी कपाटावर फायलींचे गठ्ठे, धुळीचे साम्राज्य असे अजिबात चालणार नाही. यापुढे एखाद्या शासकीय कार्यालयात घाण दिसून आल्यास दंड लावणार असल्याचे मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.
‘ते’ कारवाई करू शकतात तर...
पोलिस, लाचलुचपत विभागासह अन्य विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी इतर शासकीय ठिकाणी जाऊन कारवाई करू शकतात. त्याचप्रमाणे स्वच्छतेसंदर्भात महापालिकाही त्यांच्या कार्यालयात जाऊन कारवाई करू शकते. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. त्यामुळे आता ठोस कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे प्रशासकांनी सांगितले.