विनामास्क फिरणाऱ्यांना दणका; पैठणमध्ये एकाच दिवशी ३५२ नागरिकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 07:25 PM2020-09-10T19:25:32+5:302020-09-10T19:27:20+5:30
शासकीय पथके रस्त्यावर उतरल्याने आज मोठ्या संख्येने नागरिकांनी तोंडाला मास्क लावलेले चित्र बाजारपेठेत दिसून आले.
पैठण : कोरोनाचा आलेख वाढत असताना बेजबाबदारपणे मास्क न लावता शहरभर फिरणाऱ्या ३५२ नागरिकांवर आज पैठण शहरात कारवाई करण्यात आली. या नागरिकांना पथकाने आर्थिक दंड ठोठावण्यात आला. शासकीय पथकांनी केलेल्या कारवाईत ३५, २०० दंड वसूल करण्यात आल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले. शासकीय पथके रस्त्यावर उतरल्याने आज मोठ्या संख्येने नागरिकांनी तोंडाला मास्क लावलेले चित्र बाजारपेठेत दिसून आले.
पैठण शहरात गेल्या दहा दिवसात जवळपास १५० च्या वर कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. दुसरीकडे तोंडाला मास्क न लावता फिरणारे व दुकानासह भाजीमार्केट मध्ये कोरोनाची भिती न बाळगता गर्दी करणारे नागरिक असे चित्र दिसून येत होते. तहसीलदार चंद्रकांत शेळके, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, उप मुख्याधिकारी अब्दुल सत्तार हे अधिकारी आपापल्या पथकासह कारवाईसाठी आज रस्त्यावर उतरले.
शहरातील संभाजी चौक, खंडोबा चौक, नाथ मंदिर चौक, बस स्टँड चौक, शिवाजी महाराज चौक, भाजी मार्केट चौक, गागाभट्ट चौक, नेहरू चौक, श्री नाथ हायस्कूल चौक सह उद्यान रोड व नाथसागर परिसरात तैनात करण्यात आले. तत्पूर्वी ध्वनीक्षेपकाद्वारे सूचना देऊन जनजागृती करण्यात आली. या पथकांना तोंडाला मास्क न वापरनारे ३५२ नागरिक आढळून आले. या सर्वांना प्रत्येकी १०० रू दंड करण्यात आला. पथकात जनार्धन दराडे , मुकुंद महाजन ,अशोक मगरे,अश्विन गोजरे, पाटीलबा घुले, यांच्यासह पोलीस, तहसील व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.