लघु उद्योजकांना गंडा घालणा-याविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:37 AM2017-10-01T00:37:19+5:302017-10-01T00:37:19+5:30
वाळूज एमआयडीसी परिसरात उद्योजकांना माल पुरविण्याचे, तसेच भागीदारीत व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून अनेक लघु उद्योजकांना जवळपास अर्धा कोटीला गंडा घालणा-या एका उद्योजकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरात उद्योजकांना माल पुरविण्याचे, तसेच भागीदारीत व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून अनेक लघु उद्योजकांना जवळपास अर्धा कोटीला गंडा घालणाºया एका उद्योजकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, सुरेंद्र झा यांनी काही दिवसांपूर्वी वाळूज एमआयडीसी परिसरात एस.के. प्रॉडक्ट हाऊस या नावाची कंपनी सुरूकेली होती. या कंपनीत हाऊस किपिंगसाठी लागणारे साहित्य तयार करून सुरेंद्र झा हा या साहित्याची शहर व औद्योगिक परिसरातील उद्योजक व व्यावसायिकांना विक्री करीत होता. दरम्यानच्या कालावधीत झा याने धनेश पाटील (रा. हर्सूल परिसर) यास कंपनीत भेटीला बोलावून आपण भागीदारीत व्यवसाय सुरू करू, अशी थाप मारून १० लाखांची गुंतवणूक करण्यास सांगितले होते. या व्यवसायात चांगला अर्थिक फायदा होण्याचे झा याने आमिष दाखविल्यानंतर धनेश पाटील यांनी वेगवेगळ्या धनादेशाद्वारे झा यांच्या बँक खात्यावर ५ लाख ७० हजार रुपये जमा केले. ही रक्कम मिळाल्यानंतर झा व पाटील यांनी सुदर्शन इंटरप्रायजेस या नावाची कंपनी स्थापन के ली होती. भागीदारीत कंपनी सुरू झाल्यानंतर झा यांनी सर्व व्यवहार स्वत:कडे ठेवून पाटील यांना कुठलाही हिशोब दिला नाही. कंपनीच्या व्यवहाराची माहिती व हिशोब देत नसल्यामुळे पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे झा याने १० लाखांचा धनादेश पाटील यांना दिला होता; मात्र हा धनादेश न वटल्यामुळे, तसेच झा पैसे परत देत नसल्यामुळे धनेश पाटील यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आपली १० लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे.
उद्योजक सुरेंद्र झा याने धनेश पाटील यांच्याबरोबर शबाना शेख, किरण डिके, त्रिरत्न गंगावणे, विशाल जोगदंडे, रोहित तायडे, राजेंद्र काळे आदी लघु उद्योजकांकडून जवळपास ३८ लाख ७८ हजार रुपये घेतल्याच्या तक्रारी फसवणूक झालेल्या या लघु उद्योजकांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे केल्या आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन पोलीस आयुक्त यादव यांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.