बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर अपहाराचे गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:44 AM2017-11-04T01:44:43+5:302017-11-04T01:44:53+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन सहा अभियंत्यांसह लेखा विभागाचे दोन कर्मचारी आणि मजूर सहकारी संस्थेच्या दोन अध्यक्षांवर येथील सदर बाजार पोलीस ठाण्यात ७० लाखांच्या अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन सहा अभियंत्यांसह लेखा विभागाचे दोन कर्मचारी आणि मजूर सहकारी संस्थेच्या दोन अध्यक्षांवर येथील सदर बाजार पोलीस ठाण्यात ७० लाखांच्या अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. रस्त्याचे काम न करताच बोगस देयके उचलल्याचे या संदर्भात दाखल तक्रारीत नमूद आहे.
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता पी.पी. भागवत, के.ई कांबळे, डी. एस. बेलापटे जी.एच. राजपूत, तत्कालीन उपअभियंता ए. के. ताजी, शाखा अभियंता डी. एन. गायकवाड, लेखा अधिकारी डी. एन. गायकवाड, पी.पी. थूळ, ए. आर. श्रीवास्तव यांच्यासह हर्षवर्धन मजूर सहकारी संस्था आणि तुळजा भवानी मजूर सहकारी संस्था यांच्या अध्यक्षांचा समावेश आहे. २०१२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हट्टा ते तळणी शिवगिरी महामार्गाच्या कामाची निविदा प्रकाशित करण्यात आली होती. सदर काम मजूर संस्थेला देता येत नसताना तसेच या विभागाच्या कार्यक्षेत्राबाहेर असताना वरील मजूर संस्थांना हे काम दिल्याचे कागदोपत्री दाखविले. प्रत्यक्षात काम न करता ७० लाखांची देयके काढून अपहार केला. याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी एका व्यक्तीने लोकायुक्तांकडे केली होती. याची दखल घेत सविस्तर चौकशी करण्याचे आदेश लोकायुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला औरंगाबादला दिले होते. चौकशीत वरील संशयित दोषी आढळल्याने अखेर त्यांच्यावर प्रभारी कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम देवरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक काकडे तपास करीत आहेत.