जायकवाडी धरणातून बेकायदा पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 07:25 PM2020-02-08T19:25:32+5:302020-02-08T19:33:01+5:30
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
पैठण : पाणी परवाना नसताना जायकवाडी धरणातून बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्या १६ शेतकऱ्यावर पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जायकवाडीचे सहाय्यक अभियंता बुध्दभूषण दाभाडे यांनी आज पैठण पोलीस ठाण्यात या बाबत फिर्याद दिली आहे.या बाबत दाखल याचिकेत न्यायालयाने जायकवाडी प्रशासनास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
आज जायकवाडीचे सहाय्यक अभियंता बुध्दभुषण सुखदेव दाभाडे यांनी पैठण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, दि ५ फेब्रुवारी रोजी जायकवाडी, पोलीस व महावितरणच्या संयुक्त पथकातील रोहीत तायडे सहाय्यक अभियंता महावितरण , एस टी घुसर मोजणीदार जायकवाडी जलफुगवटा शाखा, अभिजीत कुलकर्णी व राजू तुसांबड कालवा निरिक्षक, आय डी भागवत वरिष्ठ तंत्रज्ञ महावितरण, पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिंदे व गणेश कुलट यांनी जायकवाडी धरणाच्या उजवा कालव्याच्या मुखाशी केलेल्या कारवाईत अनधिकृतपणे जलसंपदा विभागाच्या पाणी परवाण्याविना पाणी उपसा सुरू असल्याचे दिसून आले.
हा पाणी उपसा नामदेव किसण रायकर रा महंमदपुर. बाळु भगवान गिरजे रा . घारी. जितेंद्र नामदेव पाबळे रा . महमदपुर. हरिभाऊ अनंतराव चेवुलवार रा . महंमदपुर. गोपाळ प्रभाकर काळे रा सोनवाडी ( खु ). वैजनाथ एकनाथ काळे रा सोनवाडी ( खु ). अनिल रावसाहेब खेडकर रा महंमदपुर. सुनिल रावसाहेब खेडकर रा महमदपुर हे आठ शेतकरी करत होते; तर अज्ञात आठ शेतकऱ्यांचे नावे समजू न शकल्याने त्यांच्या विद्युत पंपाचे स्टार्टर जप्त करण्यात आले आहे.अनधिकृतपणे जायकवाडी धरणातून पाणी उपसा करणाऱ्या सोळा शेतकऱ्यावर कलम 430 भादवी सह कलम 92 , ( ज ) महाराष्ट्र पाटबंधारे अधीनियम 1976 प्रमाणे कारवाई करावी असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पैठण पोलीस ठाण्यात १६ शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांवरील गुन्हे रद्द करा
विद्युत पंपाद्वारे पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने आज शेतकऱ्यात मोठा रोष निर्माण झाला. पाणी परवाना संपलेल्या शेतकऱ्यांना जायकवाडी प्रशासनाने दंड आकारून परत पाणी परवाना द्यावा. शेतकरी पाणी चोरून विकत नाही शेतीलाच वापरतात याचे भान जायकवाडी प्रशासनाने ठेवावे. गुन्हा दाखल करण्यापेक्षा शेतकऱ्यांना पाणीपरवाना देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यावर दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यात यावे यासाठी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांची आपण भेट घेणार असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र काळे यांनी सांगितले.
- रविंद्र काळे, प्रदेश सरचिटणीस कॉंग्रेस