नारेगावात भोंदूबाबाचा महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:03 AM2018-08-13T01:03:28+5:302018-08-13T01:04:00+5:30
वेडसर पतीला भूतबाधा झाल्याचा बहाणा करून ते काढण्यासाठी भोंदू जाणत्याने जालना येथील एका महिलेवर चार दिवस अत्याचार केले. महिलेच्या तक्रारीवरून भोंदूबाबाला नारेगावातून जादूटोण्याच्या साहित्यासह जालना पोलिसांनी शनिवारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वेडसर पतीला भूतबाधा झाल्याचा बहाणा करून ते काढण्यासाठी भोंदू जाणत्याने जालना येथील एका महिलेवर चार दिवस अत्याचार केले. महिलेच्या तक्रारीवरून भोंदूबाबाला नारेगावातून जादूटोण्याच्या साहित्यासह जालना पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
शेख रहीमद शेख अब्दुल (४०, रा़ घाटनांदूर, बीड, ह़ मु़ नारेगाव, औरंगाबाद) असे या जाणत्याचे नाव आहे़ पोलीस सूत्रांनी सांगितले की, पीडित महिला जालन्यातील रहिवासी आहे़ तिचा पती भोळसर आहे. अनेक ठिकाणी उपचार करूनही त्याचा काही उपयोग होत नव्हता. त्यामुळे पीडितेच्या सासूने जादूटोण्याचा इलाज करण्यासाठी शेख रहीमदला बोलावले होते. शेख रहीमदने या कुटुंबाला विश्वासात घेतले़ पतीच्या अंगातील भूत काढण्यासाठी एक दिवस घरात रिंगण मारून पूजा मांडली़ रिंगणात दोघा पती-पत्नीला बसविले़ एका रिंगणात ज्वलनशील पदार्थ टाकून त्यावर कपडा टाकला़ ज्वलनशील पदार्थामुळे कपड्याने पेट घेतला़ त्यानंतर भूतबाधा मोठी असल्याचा बहाणा त्याने केला़ हा प्रकार वर्षभर सुरू होता़ दरम्यानच्या काळात पतीचा इलाज करण्यासाठी भोंदू शेख रहीमद पीडितेला घराच्या गच्चीवर नेऊन अघोरी प्रयोग करायचा़
दागिने, रोख रक्कमही लांबविली
पीडितेचे वशीकरण करून त्याने घरातील दागिने, पैसे, विमा पॉलिसी व अन्य सर्व बाबींची माहिती मिळविली़ भूत काढण्यासाठी घरातील दागिन्यांची पूजा करावी लागेल अन्यथा तुझ्या पतीचा मृत्यू होईल, असे एक दिवस त्याने पीडितेला सांगितले़ पूजा एकांतात करावी लागते, असा बहाणा करून पीडितेला दागिने घेऊन औरंगाबादमधील नारेगाव येथील घरी बोलावले़ पतीच्या आयुष्यासाठी पीडिता घरातील सर्व दागिने, रोख १ लाख ९० हजार रुपये घेऊन भोंदूबाबाकडे गेली़. भोंदू रहीमदने पीडितेला चार दिवस खोलीत डांबून पाण्यातून गुंगीचे औषध देऊन वारंवार अत्याचार केले़ हा प्रकार रहीमदच्या पत्नीच्या लक्षात आल्यानंतर ती घरातून निघून गेली़ चार दिवसांनंतर त्याने पीडितेला सिडको बसस्थानकावर नेऊन सोडले़ पीडिता नातेवाईकांशी संपर्क करून कशीबशी जालन्याला पोहोचली़
सदर बाजार ठाण्यात जाऊन (दि.६ आॅगस्ट) सोमवारी भोंदूबाबा शेख रहीमदविरुद्ध अत्याचार व जादूटोणाविरोधी कायद्यानुसार फिर्याद दिली़ गुन्हा दाखल होताच सदर बाजार पोलिसांनी नारेगाव येथून शेख रहीमदच्या मुसक्या आवळल्या़ पीडितेसह तिची मुले, सासू यांचे ८४ हजार ५०० रुपयांचे दागिने व रोख ४१ हजार रुपये हस्तगत केले़ जादूटोण्यासाठी वापरलेले साहित्यही जप्त केले़ शेख रहीमदला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ उपनिरीक्षक रमेश रुपेकर आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली़