एमआयएमच्या तीन नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:51 AM2017-10-18T00:51:14+5:302017-10-18T00:51:14+5:30
महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना सरकारी कामात अडथळा करून मालमत्तेची तोडफोड केल्याप्रकरणी एमआयएमच्या सय्यद मतीन बिल्डर, शेख जफर (बिल्डर) आणि अजीम अहमद या तिघांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा मंगळवारी सायंकाळी उशिरा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना सरकारी कामात अडथळा करून मालमत्तेची तोडफोड केल्याप्रकरणी एमआयएमच्या सय्यद मतीन बिल्डर, शेख जफर (बिल्डर) आणि अजीम अहमद या तिघांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा मंगळवारी सायंकाळी उशिरा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरून एमआयएमचे नगरसेवक आक्रमक झाले. यावेळी त्यांनी महापौरांसमोरील राजदंड हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षारक्षकाने अडविल्याने त्याला नगरसेवकांनी मारहाण केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करून महापौर यांच्या दिशेने सभागृहात असणा-या खुर्च्याही भिरकावल्या. या प्रकारामुळे सभागृहात वातावरण तणावपूर्ण बनले होते. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा करणे, सरकारी मालमत्तेची तोडफोड केल्याप्रकरणी तीन नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे मुख्य सुरक्षारक्षक बाळू सांडू जाधव यांनी सिटी चौक ठाण्यात मंगळवारी तक्रार दिली आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही, असे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी सांगितले. या प्रकरणी महापालिकेने दोन नगरसेवकांचे कायमस्वरूपी निलंबन केले आहे.