डॉक्टरला धमकावल्याप्रकरणी औरंगाबाद येथील छावणी परिषदेच्या नगरसेवकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 19:06 IST2017-11-25T19:05:32+5:302017-11-25T19:06:02+5:30
गॅस्ट्रोचे वाढलेले रुग्ण तपासात असताना त्या रुग्णांना सोडून सोबत आणलेल्या रुग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टरला धमकावणा-या छावणी बोर्ड परिषदेच्या माजी उपाध्यक्षा तथा नगरसेवकविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

डॉक्टरला धमकावल्याप्रकरणी औरंगाबाद येथील छावणी परिषदेच्या नगरसेवकावर गुन्हा
औरंगाबाद : गॅस्ट्रोचे वाढलेले रुग्ण तपासात असताना त्या रुग्णांना सोडून सोबत आणलेल्या रुग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टरला धमकावणा-या छावणी बोर्ड परिषदेच्या माजी उपाध्यक्षा तथा नगरसेवकविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला. १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या या घटनेप्रकरणी डॉक्टरांनी २५ नोव्हेंबर रोजी पोलिसांत तक्रार नोंदविली.
शेख हनीफ उर्फ बब्बू असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपी नगरसेवकाचे नाव आहे. छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी याघटनेविषयी सांगितले की, छावणी परिषदेच्या हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद पद्माकर धामंदे हे १६ नोव्हेंबर रोजी कर्तव्य बजावत होते. १६रोजी छावणी परिसरात गॅस्ट्रोचा प्रकोप वाढल्याने रुग्णांची संख्या हजारोंची झाली होती. सर्व डॉक्टरांप्रमाणे डॉ.धामंदे हे गॅस्ट्रोच्या रुग्णांवर उपचार करीत होते. यावेळी नगरसेवक शेख हनीफ उर्फ बब्बू सोबत एक रुग्ण घेऊन आला. या रुग्णाच्या चेह-यावर फोड आलेला होता. गॅस्ट्रोचे रुग्ण सोडून या रुग्णावर उपचार करा, असे बब्बू डॉक्टरांना म्हणाले. तेव्हा थोडं थांबा,असे डॉक्टर म्हणाले असता. नगरसेवक चिडले आणि त्यांनी डॉक्टरांना शिवीगाळ करून सोबतच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी दमदाटी केली.
यावेळी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणा-या अन्य स्टाफ नर्स आणि कर्मचा-यांनाही त्यांनी धमकावले. या घटनेला सात दिवस उलटल्यानंतर डॉक्टरांनी याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी तपास सुरू केल्याचे पो.नि. बहुरे म्हणाले.