पीएफ थकविल्याप्रकरणी नरसिम्हा आॅटोविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:08 PM2018-12-11T23:08:35+5:302018-12-11T23:08:49+5:30
नरसिम्हा आॅटो कंपोनंट या कंपनीने कामगारांचा तीन महिन्यांचा पीएफ थकविल्याप्रकरणी कंपनी मालक दिलीप नरहरराव धारुरकर यांच्याविरुद्ध मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील नरसिम्हा आॅटो कंपोनंट या कंपनीने कामगारांचा तीन महिन्यांचा पीएफ थकविल्याप्रकरणी कंपनी मालक दिलीप नरहरराव धारुरकर यांच्याविरुद्ध मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप धारुरकर (रा. कलासागर अपार्टमेंट, ज्योतीनगर, औरंगाबाद) यांची वाळूज एमआयडीसीत नरसिम्हा आॅटो कंपोनंट प्रा. लि. या नावाची कंपनी आहे. यातील कामगारांच्या वेतनातून कंपनी व्यवस्थापनाने दरमहा मूळ वेतनाच्या १२ टक्के रक्कम कपात करुन कंपनीच्या अंशदानासह स्टेट बँक आॅफ इंडियात चलनाद्वारे प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत जमा करणे बंधनकारक आहे. मात्र, नरसिम्हा कपंनीने जुलै, आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये पीएफ बँकेत भरला नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.
कामगारांच्या पीएफपोटी ४ लाख ८३ हजार ७५५ रुपयांचा भरणा करण्यासंदर्भात भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने १५ नोव्हेंबरला कंपनीला नोटीस बजावली होती. मात्र यानंतरही कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर भविष्य निधी कार्यालयाचे प्रवर्तन अधिकारी मुक्तेश्वर व्यास यांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन कंपनीमालक दिलीप धारुरकर यांच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.