एकाच वेळी शिक्षक आणि फार्मासिस्ट; प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 08:46 PM2020-01-09T20:46:54+5:302020-01-09T20:49:37+5:30
८ आॅगस्ट २००५ ते ४ सप्टेंबर २०१३ दरम्यान ही फसवणूक झाली.
औरंगाबाद : औषधी दुकानात पूर्णवेळ फार्मासिस्ट असल्याचे शासनास दाखवून एका महाविद्यालयात नोकरी करणाऱ्या प्राचार्याविरोधात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ८ आॅगस्ट २००५ ते ४ सप्टेंबर २०१३ दरम्यान ही फसवणूक झाली.
झहीद जहीर अहेमद जहीर असे गुन्हा नोंद झालेल्या प्राचार्याचे नाव आहे. याविषयी क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, झहीद वाय.बी.चव्हाण. औषध निर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. असेफिया कॉलनी येथील मे. ताबिश मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर येथे ८ आॅगस्ट २००५ ते ४ सप्टेंबर २०१३ या कालावधीत औषधनिर्माता म्हणून पूर्णवेळ कार्यरत असल्याची कागदपत्रे त्यांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे सादर केली होती. औषध निरीक्षकांनी केलेल्या तपासणीत झहीद मे. ताबिश मेडिकल स्टोअरमध्ये न आढळल्याने २०१३ साली दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला होता. तेव्हापासून हे दुकान बंद आहे.
मात्र, वाय.बी. चव्हाण औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य म्हणून कार्यरत प्रा. झहीद ८ आॅगस्ट २००५ ते ४ सप्टेंबर २०१३ या कालावधीत मे. ताबिश मेडिकल स्टोअरमध्ये पूर्णवेळ औषधनिर्माता म्हणून काम करीत असल्याचे दाखवीत असत, अशी तक्रार अन्न व औषधी प्रशासन विभाग आणि मंत्रालयात एका जणाने केली होती. प्रशासनाने या तक्रारीची चौकशी केली. चौकशीत या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने औषधी निरीक्षक राजगोपाल मूलचंद बजाज यांनी ७ जानेवारी रोजी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात प्राचार्य झहीद यांच्याविरोधात शासनाची फसवणूक केल्याची तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक उत्तम मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पुणे तपास करीत आहेत.