शहरातील केवळ ११० रुग्णालयांचे फायर ऑडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:02 AM2021-03-27T04:02:52+5:302021-03-27T04:02:52+5:30
औरंगाबाद : मागील दोन दशकांत ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील शासकीय आणि खासगी आरोग्य यंत्रणेने मोठी कामगिरी केली. मराठवाड्यासह आसपासच्या जिल्ह्यातील ...
औरंगाबाद : मागील दोन दशकांत ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील शासकीय आणि खासगी आरोग्य यंत्रणेने मोठी कामगिरी केली. मराठवाड्यासह आसपासच्या जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या संख्येने शहरात उपचारासाठी येतात. शहरातील लहान-मोठ्या रुग्णालयांची संख्या जवळपास ६०० पर्यंत पोहोचली आहे. त्यातील ११० रुग्णालयांनीच फायर ऑडिट करून घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मुंबईच्या भांडूप परिसरातील एका मॉलमध्ये आग लागली. या मॉल परिसरात एक रुग्णालयसुद्धा होते. आगीमुळे रुग्णालयातील १० निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर राज्यभरातील रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा मुद्दा उपस्थित झाला आहे. औरंगाबाद शहरात तब्बल ६०० रुग्णालये असून त्यातील फक्त ११० रुग्णालयांनी महापालिकेकडे फायर यंत्रणा असल्याचा अहवाल सादर केलेला आहे. ४९० रुग्णालयांनी मागील अनेक वर्षांमध्ये महापालिकेकडे फायर ऑडिटचे प्रमाणपत्र सादर केलेले नाही. फायर ऑडिट नसूनही महापालिकेने आजपर्यंत एकाही रुग्णालयावर कठोर कारवाई केलेली नाही, हे विशेष. फायरसंबंधी प्रमाणपत्र नसतानाही रुग्णालयांना दरवर्षी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून परवानगीचे नूतनीकरण करून देण्यात येते. महापालिकेच्याच दोन विभागांमध्ये समन्वय नसल्यामुळे अनेक वर्षांपासून जवळपास ५०० रुग्णालये फायर एनओसीविना सुरू आहेत. रुग्णांच्या सुरक्षेसाठी अग्निशमनरोधक यंत्रणा बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे. तरीही नियम धाब्यावर बसवून अनेक रुग्णालये याकडे दुर्लक्ष करतात.
५० खाटांपेक्षा कमी रुग्णालय असेल तर
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काही वर्षांपूर्वी ५० बेडपेक्षा कमी बेडचे रुग्णालय असेल तर त्यांना फायर ऑडिट सक्तीचे करू नये, असा ठराव घेण्यात आला आहे. या ठरावाचा आधार घेत अनेक रुग्णालये महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे फायर एनओसी घेण्यासाठी येत नाहीत.
आर. के. सुरे, अग्निशमन अधिकारी, महापालिका.