सातारा, कांचनवाडीच्या डोंगरावर वणवा पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:04 AM2021-02-11T04:04:56+5:302021-02-11T04:04:56+5:30
औरंगाबाद : सातारा, कांचनवाडी डोंगरावर बुधवारी सायंकाळी अचानक आग लागल्याने ५ हेक्टरवरील वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग आटोक्यात ...
औरंगाबाद : सातारा, कांचनवाडी डोंगरावर बुधवारी सायंकाळी अचानक आग लागल्याने ५ हेक्टरवरील वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.
या डोंगरावर वनक्षेत्र घनदाट असल्याने आगीच्या वणव्याने कांचनवाडी, विटखेडा, नक्षत्रवाडी असा घेर घेतला होता. डोंगरपायथ्याला राहणाऱ्यांनी सायंकाळी ५ च्या सुमारास आगीची माहिती वन विभाग तसेच अग्निशामक विभागाला दिली. अग्निशामक विभागाच्या गाड्या डोंगरपायथ्याशी गेल्या, परंतु त्यांच्याकडे वेगळी अशी यंत्रणा नसल्याने त्यांना डोंगरावर जाता आले नाही. वाट अवघड असल्याने मदतकार्य करणाऱ्यांना वर जाणे शक्य नव्हते. गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने डोंगरावर झाडी, झुडपे अधिक घनदाट झालेली आहेत. उन्हामुळे गवत सुकल्याने आग वेगाने पुढेपुढे सरकत जात होती.
४० कर्मचारी मदतकार्यात...
जंगलातील पेटलेला वणवा शांत करण्यासाठी औरंगाबाद वन विभागाकडे कोणतीही वेगळी यंत्रणा नाही. वन क्षेत्रातील आग आटोक्यात आणण्यासाठी ‘डेड फायर’चा (आग पुढे सरकू नये, यासाठीचे प्रयत्न) प्रयोग केला. हाच एक उपाय महत्त्वपूर्ण मानला जातो. गतवर्षीही सातारा डोंगरावर आगीचा प्रकार घडला होता. त्यावेळी देखील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली होती. सायंकाळी ५ वाजेपासून सर्व यंत्रणा कामाला लागली असून, रात्री उशिरापर्यंत त्यांचे मदतकार्य सुरू होते.
शहरातील अग्निशामक विभागाच्या गाड्यांनी घेरले...
सातारा, कांचनवाडी, विटखेडा डोंगरपायथ्याला अग्निशामक विभागाच्या गाड्यांनी वेढा टाकला होता. डोंगरावर मदतकार्य करणे शक्य नव्हते, परंतु आग पायथ्याशी असलेल्या वसाहतीत पसरू नये म्हणून अग्निशामक विभागाच्या गाड्या सज्ज होत्या.
वन्यजीवांसह वनसंपदेचे नुकसान
घनदाट वनक्षेत्र असल्याने त्यात विविध पशु, पक्ष्यांचा वावर आहे. आगीमुळे वन्यजीवांची हानी झाल्याचे वनप्रेमींचे म्हणणे आहे. शासनाने आपत्कालीन यंत्रणा तयार ठेवावी, अशा गंभीरप्रसंगी ती वापरण्यास मदत होईल, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
आग आटोक्यात, परंतु धग उशिरापर्यंत...
कुणी तरी माथेफिरूने डोंगरावरील आग लावली असावी, असा कयास आहे. वन कर्मचारी तसेच यंत्रणेने मदतकार्य केल्याने, आग पसरण्यापासून रोखण्यात यश आले आहे. परंतु ५ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात आग पसरणार नाही, याचा आटोकाट प्रयत्न आम्ही करत आहोत. कर्मचारी डोंगरावरच आगीशी झुंज देत आहेत.
- वनपरिक्षेत्र अधिकारी शशिकांत तांबे
५.१५ वाजता कॉल...
मनपाच्या अग्निशामक विभागाला बुधवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास पहिला कॉल आला आणि एक गाडी मदतीला पाठविली. परंतु आगीचे गंभीर रूप पाहता पद्मपुरा, सिडको, एमआयडीसी, तसेच इतरही ठिकाणाहून गाड्या पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
(फोटो)