घराला आग लागून सहा लाखाचे साहित्य खाक
By Admin | Published: May 29, 2017 12:26 AM2017-05-29T00:26:53+5:302017-05-29T00:28:35+5:30
अणदूर : तुळजापूर तालुक्यातील चिवरी शिवारातील शेतातील एका घराला २७ मे रोजी रात्री अचानक आग लागली़
लोकमत न्यूज नेटवर्क
अणदूर : तुळजापूर तालुक्यातील चिवरी शिवारातील शेतातील एका घराला २७ मे रोजी रात्री अचानक आग लागली़ या आगीत संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम, सोन्याचे दागिने व इतर संसारोपयोगी साहित्य असे सहा लाखाचे साहित्य जळून खाक झाले़
अणदूर येथील चंद्रकांत शिवलिंग राजमाने हे चिवरी शिवारातील शिवराज कुताडे यांच्या शेतात राहतात़ राजमाने कुटुंबिय २७ मे रोजी रात्री उकाड्यामुळे घराबाहेर झोपले होते़ मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागली़ कच्चे बांधकाम असलेल्या घराला गालेली आग वाऱ्यामुळे जास्तच पसरली़ लागलेली आग विझविण्यासाठी गेलेले विकास चंद्रकांत राजमाने (वय २४) हे २० टक्के भाजले आहेत़ त्यांना १०८ च्या रूग्णवाहिकेतून उपचारासाठी नेण्यात आले़ या आगीमध्ये दोन शेळ्या, बोक बोकडं सापडले असून, तेही भाजलेल्या अवस्थेत जिवंत आहेत़ ही आग आटोक्यात आणण्यासाठी युवराज मुळे यांचे पाण्याचे टँकर आणून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते. या आगीत राजमारे यांच्या घरावरील ४० पत्रे, १४ दंट्टे, तीन मोठी कवाडे, ८ पोती ज्वारी, ५ पोती गहू, ६ पोती मका, ५ पोती भुईमूग, २ पोती हरभरा, २ पोती तूर, १ पोते मूग, १ पोते पेंड, २ पोती भुसा, ५ पोती युरिया, १८ पोती डीएपी, रोख रक्कम ३५ हजार रुपये, संसारोपयोगी साहित्य, शेतातील महत्त्वाचे अवजारे, मोटार, पाईप असे जवळपास सहा लाख रूपयांचे साहित्य जळून खाक झाले़ राजमाने कुटुंबियांच्या घरातील सदस्यांच्या अंगावरील कपडे वगळता एकही वस्तू आगीपासून शिल्लक राहिली नाही. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर पडला असून, प्रशासनाने त्यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे़
दरम्यान, आग विझविण्यासाठी केदार आलुरे व राम कोरे यांनी नळदुर्ग येथील अग्निशामक दलाला संपर्क साधला होता़ मात्र, गाडीमध्ये पाणी नाही म्हणून गाडी येवू शकत नाही असे उत्तर मिळाले़ त्यानंतर महावितरण कार्यालयात फोन करून १० ते १५ मिनिटे लाईट सुरू करा, आम्ही पाणी भरून घेऊन आग आटोक्यात आणू, अशी विनंती करण्यात आली होती़ मात्र, तरीही वीज सुरू करण्यात आली नाही़ नळदुर्ग येथील अग्निशमन दलाची गाडी किंवा महावितरणने रात्री वीजपुरवठा सुरू केला असता तर राजमाने यांच्या घरातील काहीतरी साहित्य वाचविण्यात यश आले असते, अशी प्रतिक्रीया घटनास्थळी उपस्थित नागरिक देत आहेत़ तर घटनेनंतर अणदूर सज्जाचे तलाठी दत्तात्रय बोंदर यांच्याशी संपर्क साधला असता, सकाळी पंचनामा करू, असे त्यांनी सांगितले़ मात्र, ते घटनास्थळी आलेच नाहीत. तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठीही घटनास्थळाकडे फिरकले नाहीत़ अणदूर येथील तलाठी कार्यालयातील सेवक गुंडू रजपूत यांनी घटनेचा पंचनामा केला़