शहरातील ४३ शिकवणी वर्ग चालकांना अग्निशमन विभागाच्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 06:51 PM2019-05-29T18:51:02+5:302019-05-29T18:53:25+5:30
सुरतमधील शहरातील अग्निकांडानंतर अग्निशमन विभाग सक्रीय
औरंगाबाद : सुरतमधील शहरातील अग्निकांडानंतर अग्निशमन विभागाने खरबदारी उपाय म्हणून शहरातील खाजगी शिकवणी वर्ग चालकांची तपासणी सुरू केली आहे. पाहणीनंतर त्यांना अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी नोटिसा देण्याचे काम सुरू केले. दोन दिवसांत ४३ वर्ग चालकांना नोटिसा बजावण्यात आल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांनी सांगितले.
अग्निशमन विभागाने सोमवारी पहिल्याच दिवशी दहा जणांना नोटिसा बजावल्या होत्या. आज दुसऱ्या दिवशी ३३ जणांना नोटिसा देण्यात आल्या. या नोटिसांद्वारे खाजगी शिकवणी वर्ग चालकांना आठवडाभरात आग प्रतिबंधक उपाययोजना करून ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याचे आदेशित केले आहे. सुरत शहरात चार दिवसांपूर्वी बहुमजली इमारतीमधील खाजगी शिकवणी वर्गाला आग लागली. त्यात २१ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला. औरंगाबाद शहरातही औरंगपुरा, टी. व्ही सेंटर, सिडको, गजानन महाराज मंदिर परिसर, खोकडपुरा, नूतन कॉलनी, जालना रोड, महेशनगर, संग्रामनगर उड्डाणपूल परिसर आदी भागात मोठ्या प्रमाणावर खाजगी शिकवणी वर्ग चालविले जातात. अनेक वर्ग बहुमजली इमारतीत तिसऱ्या, चौथ्या मजल्यावर आहेत. नियमानुसार सार्वजनिक वापराच्या सर्व इमारतींसाठी ना-हरकत प्रमाणपत्र घेणे अपेक्षित आहे. शहरात दुर्लक्ष होत आलेले आहे. त्यामुळे आता वर्ग चालकांना नोटिसा बजावून त्यांना आठ दिवसांत आवश्यक उपाययोजना करून ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यास सांगण्यात येत आहे.
स्वतंत्र पथक
मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारपासून नोटिसा बजावण्याची मोहीम सुरू आहे. अग्निशमन विभागाच्या पथकाने सोमवारपासून ही मोहीम सुरू केली आहे. या पथकात एन. के. पठाण, वैभव बाकडे, बी. डी. साळुंके आदींचा समावेश आहे.