चिकलठाणा एमआयडीसीतील इलेक्ट्रॉन एनर्जी गोडाऊनला आग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 06:30 PM2019-05-19T18:30:29+5:302019-05-19T18:30:45+5:30
चिकलठाणा एमआयडीसीतील इलेक्ट्रॉन एनर्जी या कंपनीच्या एलईडी ठेवलेल्या गोडावूनला रविवारी दुपारी आग लागली.
औरंगाबाद: चिकलठाणा एमआयडीसीतील इलेक्ट्रॉन एनर्जी या कंपनीच्या एलईडी ठेवलेल्या गोडाऊनला रविवारी दुपारी आग लागली. अग्निशमन दलाच्या चार बंबासह जवानांनी पाच तास केलेल्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. या घटनेत सुमारे एक कोटी रुपयांचा माल जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज कंपनीच्या व्यवस्थापकांनी व्यक्त केला.
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, महापालिका हद्दीतील जुने पथदिवे काढून एलईडी दिवे बसविण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम दिल्लीतील इलेक्ट्रॉन एनर्जी ही करीत आहे. या कंपनीने एक वर्षापूर्वी चिकलठाणा एमआयडीसीमधील चैतन्य जी यांच्या मालकीचे गोडावून भाड्याने घेतले आहे. या गोडावूनमध्ये एलईडीचा साठा करून ठेवण्यात आला आहे. शिवाय शहरातील पथदिव्याचे एलईडी बदलल्यानंतर जुने पथदिवे आणि पथदिव्याचे पॅनल काढून आणलेले आहेत. जुनी पथदिवे आणि पॅनलही तेथेच जमा करून ठेवण्यात आले. एलईडी चे नवीन पॅनल, फिटींगसाठी वापरले जाणारे पुठ्ठे, केबल बंडलसह, एलईडी बसविण्याचे काम करण्यासाठी वापरण्यात येणा-या आठ ते दहा मिनी टेम्पो, क्रेन गोडावूनच्या प्रवेशद्वाराच्या आत उभी करून ठेवण्यात आली होती.
दुपारी बारा वाजेच्या सुमारास अचानक गोडावूनमध्ये आग लागली. ही आग दिवसताच गोडावून व्यवस्थापक अक्षय गुगळे यांनी घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला कळविली. गोडावूनच्या मध्यभागी लागलेली आग पसरत प्रवेशद्वाराकडे आली आणि त्याचवेळी आलेल्या वा-यामुळे आग गोडावूनच्या इतर भागापर्यंत पसरली. अग्निशमन दलाच्या सिडको येथील जवानांनी बंबासह आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र आग वाढतच असल्याचे पाहून एमआयडीसी ,पदमपुरा आणि गरवारे, व्हिडिओकॉन येथील अग्निशमक दलाला घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर आणखी तीन बंब आणि पाण्याचे टँकर दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल पाच तास केलेल्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले.