बजाजनगरमध्ये ईएसआयसी दवाखान्याला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:22 PM2018-12-29T23:22:06+5:302018-12-29T23:22:30+5:30

राज्य कामगार विमा योजना सेवेच्या दवाखान्याला (ईएसआय) शनिवारी पहाटे अचानक आग लागली. यात रेकॉर्ड रूमधील संगणकासह कागदपत्रे व इतर साहित्य भस्मसात झाले आहे.

Fire at ESIC hospital in Bajajnagar | बजाजनगरमध्ये ईएसआयसी दवाखान्याला आग

बजाजनगरमध्ये ईएसआयसी दवाखान्याला आग

googlenewsNext

वाळूज महानगर : बजाजनगरातील राज्य कामगार विमा योजना सेवेच्या दवाखान्याला (ईएसआय) शनिवारी पहाटे अचानक आग लागली. यात रेकॉर्ड रूमधील संगणकासह कागदपत्रे व इतर साहित्य भस्मसात झाले आहे. ही घटना पहाटेच्या वेळी घडल्याने मुंबईतील घटनेची पुनरावृत्ती टळली आहे. दरम्यान, शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज दवाखाना प्रशासनाने केला आहे. या घटनेमुळे कामगार रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कामगार व त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या आणि अल्प दरात आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून ईएसआयसी प्रशासनाने बजाजनगरमध्ये ईएसआयसी दवाखाना सुरू केला; पण आजघडीला या इमारतीच्या भिंती व छताला भेगा पडल्या आहेत. याठिकाणी दररोज शेकडो कामगार व त्यांचे नातेवाईक उपचारासाठी ये-जा करतात. शुक्रवारी रात्री दवाखाना बंद करून कर्मचारी घरी गेले होते. शनिवारी पहाटे ५.३० ते ६.०० वाजेच्या सुमारास बाजूच्या एका खाजगी अकॅडमीची मुले व्यायामासाठी जात असताना त्यांना दखान्यातून धूर येत असल्याचे दिसले. मुलांनी खालच्या बाजूस असलेल्या मेडिकलच्या मालकास उठवून घटनेची माहिती दिली. त्यांनी तात्काळ याची माहिती अग्निशमन केंद्राला देत ईएसआयसीच्या आरएमओ अंजली बनसोड यांना कळविले. अग्निशमन जवानांनी घटनास्थळ गाठत सुरुवातीला दवाखान्याचा वीजपुरवठा बंद केला. त्यानंतर दरवाजा तोडून पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविले. अर्ध्या तासानंतर आग विझविण्यात जवानांना यश आले. दरम्यान, ईएसआयसीचे विभागीय उपसंचालक संजीव यादव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विवेक भोसले, डॉ. पृथ्वीराज राठोड यांनी दवाखान्याची पाहणी केली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा करून घटनेची नोंद केली आहे. विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे इतरत्र आग पसरली नाही. यात सुदैवाने संभाव्य वित्तहानी टळली.


संगणकासह इतर साहित्य खाक
आगीत कार्यालयीन अभिलेखे, जवळपास १०० कामगारांची वैद्यकीय खर्चप्रतिपूर्तीची देयके, दोन संगणक, दोन प्रिंटर्स, राऊटर, दोन टेबल, एक फॅन, दोन खुर्च्या, दोन कपाट, केबल वायरिंग, टीव्ही संच, तसेच इतर कार्यालयीन व रुग्णाच्या नोंदी असलेली कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. यात जवळपास एक ते दीड लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा दावा ईएसआयसी प्रशासनाने केला आहे.
संलग्नित रुग्णालयात व्यवस्था
दवाखान्याला आग लागल्याने रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून परिसरातील चार संलग्नित रुग्णालयांत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचबरोबर या दवाखान्याचे लवकरच पंढरपुरातील महावीर चौकालगत एका इमारतीत स्थलांतर करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी पृथ्वीराज राठोड यांनी सांगितले.

‘लोकमत’चे भाकीत खरे ठरले
‘लोकमत’ने बजाजनगरातील ईएसआयसी दवाखान्याच्या दुरवस्थेबाबतचे वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, तसेच दवाखान्यातील वीजपुरवठा करणाऱ्या वायरिंग उघड्या व लोंबकळलेल्या अवस्थेत असल्याने आग लागण्याची शक्यता वर्तविली होती. शनिवारी दवाखान्याला लागलेल्या आगीच्या घटनेमुळे ‘लोकमत’ने वर्तविलेले भाकीत खरे ठरले आहे.

Web Title: Fire at ESIC hospital in Bajajnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.