अग्निशमन केंद्रांची वानवा

By Admin | Published: January 2, 2015 12:31 AM2015-01-02T00:31:10+5:302015-01-02T00:49:59+5:30

अशोक कांबळे, औरंगाबाद शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचाऱ्यांची वानवा आहे़

Fire Fighting Centers | अग्निशमन केंद्रांची वानवा

अग्निशमन केंद्रांची वानवा

googlenewsNext

अशोक कांबळे, औरंगाबाद
शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचाऱ्यांची वानवा आहे़ निसर्गनिर्मित संकट अथवा काही आपत्ती आल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी किमान ८ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता आहे; परंतु सद्य:स्थितीत शहरात केवळ तीनच केंद्रे असून, त्यामध्येही अपुरी कर्मचारी संख्या आहे. विशेष म्हणजे सरकारची मान्यता असूनही महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे पाच अग्निशमन केंद्रांची उभारणी होऊ शकली नाही.
सद्य:स्थितीत शहराची लोकसंख्या १३ लाखांच्या घरात आहे़ औद्योगिकरणामुळे येत्या काही काळात शहराची लोकसंख्या वेगाने वाढणार आहे.
एखादे निसर्गनिर्मित किंवा मानवनिर्मित संकट ओढावले, तर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात किमान ८ अग्निशमन केंद्रांची गरज आहे; परंतु प्रत्यक्षात मात्र शहरात सिडको, चिकलठाणा व रेल्वेस्टेशन परिसर अशा केवळ तीनच ठिकाणी अग्निशमन केंदे्र आहेत.
विशेष म्हणजे या तीन केंद्रांवर पुरेसे कर्मचारी नाहीत़ त्यामुळे निम्म्या कर्मचाऱ्यांवरच कामाचा अतिरिक्त भार पडत असल्याने त्यांच्यावर १८ ते २० तास काम करण्याची वेळ येत आहे़ शहरात आणखी पाच नवीन केंद्रे निर्माण करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे; परंतु प्रशासनाकडून केंद्र उभारणीसाठी कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीत़
अपुरे कर्मचारी
शहरात तीन ठिकाणी असलेल्या अग्निशमन कें द्रांमध्ये एकूण ८१ पदे मंजूर आहेत; परंतु सध्या ५१ कर्मचारी कार्यरत असून तब्बल ३० पदे रिक्त आहेत़ स्टेशन आॅफिसर १, उपअग्निशमन अधिकारी ४, अग्निशमनप्रमुख १, ड्रायव्हर आॅपरेटर ४, अग्निशामक १२, टेलिफोन आॅपरेटर ५ व लिपिक १ अशी पदे रिक्त आहेत़ अनेक वर्षांपासून वाढीव पदांसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला आहे; परंतु त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही़ विशेष म्हणजे कार्यरत असलेले कर्मचारी जवळपास ४० ते ५० या वयातील असल्याने त्यांना धावपळीचे काम करताना मर्यादा पडत आहेत़
स्वत:ची रुग्णवाहिका नाही
आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विभाग असलेल्या अग्निशमन केंद्राकडे अद्याप स्वत:ची एकही रुग्णवाहिका नाही़ आपत्कालीन काळात अग्निशमन केंद्राला दुसऱ्यांच्या रुग्णवाहिकेवर अवलंबून राहावे लागते़ त्यामुळे अनेकदा रुग्ण वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावण्याची शक्यता निर्माण होते़ अग्निशमन कें द्राकडे स्वत:ची रुग्णवाहिका असणे अत्यंत गरजेचे आहे; परंतु याकडे कोणीच लक्ष देत नाही़

Web Title: Fire Fighting Centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.