किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले

By सुमित डोळे | Published: May 4, 2024 12:20 AM2024-05-04T00:20:30+5:302024-05-04T00:22:02+5:30

अरुंद रस्ते, वीजपुरवठा खंडित झाल्याने मदतीला उशीर, परिसरात सर्वत्र विजेच्या तारा घरावरच लोंबकळलेल्या

Fire in Kiradpura Schhatrapati sambhajinagar; Three consecutive explosions due to cylinders, electric wires, child killed, 8 burnt | किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले

किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले

छत्रपती संभाजीनगर : किराडपुऱ्यातील रोशन मस्जिदजवळील गल्ली क्र. १५ मध्ये दोन खोल्यांच्या घराने अचानक पेट घेतला. क्षणार्धात आगीचा भडका होऊन घरातील सिलिंडर पेटले व घराला चिकटलेल्या विजेच्या तारांमुळे सलग दोन ते तीन स्फोट झाले. या घटनेत चारवर्षीय चिमुकलीचा भाजल्याने मृत्यू झाला, तर ८ जण गंभीररीत्या भाजले. शुक्रवारी रात्री ८:३० वाजता ही दुर्घटना घडली.

इरफान पठाण हे दोन भावांसह सदर ठिकाणी राहतात. शुक्रवारी रात्री ते नुकतेच कामावरून परतले होते. कुटुंबातील महिला स्वयंपाकाची तयारी करत होत्या. मात्र, रात्री ८:३० वाजेच्या सुमारास अचानक घरात आग लागली. पाहता पाहता आगीने संपूर्ण खाेलीला वेढले. कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली. ते आतच अडकले; पण आग वाढत असल्याने त्यांनी घराबाहेर धाव घेतली. मात्र, ४ वर्षांची सदफ आतच अडकल्याचे लक्षात आले. तिला वाचवण्यासाठी कुटुंबीयांनी पुन्हा आत धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सिलिंडरचा स्फोट होऊन घराचे पत्रे हवेत फेकले गेले. विजेच्या तारा घराच्या वरच लोंबकळत असल्याने ठिणग्या उडून पुन्हा दोन ते तीन स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. परिसरात एकच धावपळ उडाली. स्थानिक तरुणांनी धाव घेत पाणी व वाळू टाकून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. घटनेची माहिती कळताच जिन्सी पोलिसांसह अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली.

सदफचा जागीच मृत्यू, एक गंभीर
घाटीतून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेत सदफचा घरातच जळून मृत्यू झाला, तर रिझवान खान सत्तार खान (४०), रिहान चांद शेख (१७), अदिल खान इरफान खान (१०), फैजान रिझवान पठाण (१३), दिशान रिझवान खान (९) यांच्यावर घाटीत उपचार सुरू होते.

गल्ली-बोळांमुळे अडचणी
किराडपुऱ्यातील अरुंद रस्त्यांचा गंभीर प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाला. आग लागल्यानंतर अरुंद रस्ते, खंडित झालेला वीजपुरवठा व बघ्यांच्या गर्दीमुळे मदतीमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. घराच्या भिंती कमजोर बनल्या. स्थानिकांनी भिंतींना अखेर बांबूचा आधार दिला. रात्री १० वाजेपर्यंत कुटुंबातील एक जण सापडत नसल्याचे सांगितले जात होते. मात्र, अग्निशमन विभागाने मलबा काढला असता कोणीही सापडले नसल्याचे सांगितले. अग्निशमन विभागाचा बंबदेखील बोळीत जाणे अशक्य होते. परिणामी, जवानांनी प्रयत्न करण्यापूर्वीच घर बेचिराख झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपायुक्त नवनीत काँवत, प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त धनंजय पाटील, निरीक्षक संदीप गुरमे, रामेश्वर गाडे, गौतम पातारे यांच्यासह फॉरेन्सिक विभाग, श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती.

Web Title: Fire in Kiradpura Schhatrapati sambhajinagar; Three consecutive explosions due to cylinders, electric wires, child killed, 8 burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.