खामगाव फाटा येथील कापूस खरेदी केंद्राला आग, लाखोंचा कापूस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:06 AM2021-01-03T04:06:45+5:302021-01-03T04:06:45+5:30
लाखोंचा कापूस जळून खाक : दोन तासांनी पोहोचले अग्निशमन बंब, कामगारांनी विझविली आग वडोदबाजार : खामगाव फाटा येथील ...
लाखोंचा कापूस जळून खाक : दोन तासांनी पोहोचले अग्निशमन बंब, कामगारांनी विझविली आग
वडोदबाजार : खामगाव फाटा येथील राजेंद्र फायबर जिनिंग अर्थात शासकीय कापूस खरेदी (सीसीआय) केंद्राला आग लागून लाखो रुपयांचा कापूस या आगीत भस्मसात झाला. शनिवारी सकाळी नऊ वाजेदरम्यान ही घटना घडली.
कापसाच्या दोन गंजीला अचानक आग लागली. काही वेळेतच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात पत्र्याच्या शेडमध्ये असलेला हजारो क्विंटल कापूस भस्मसात झाला. आगीच्या धुराने संपूर्ण परिसर झाकला गेला होता. एकदम लागलेल्या आगीमुळे येथील कामगार भयभीत झाले. त्यात सकाळी असलेल्या धुक्यामुळे आग केवढी मोठी आहे, हे कळण्यास विलंब झाला. त्यामुळे आगीचे रूप झपाट्याने वाढले होते. जिनिंग प्रशासनाने या ठिकाणी असलेल्या अग्निशमक (छोट्या) बंबाच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचे रौद्र रूप वाढूच लागले. काही कर्मचाऱ्यांनी हौदातील पाणी टाकले. त्यामुळे आग विझविण्यात काही अंशी यश आले.
या घटनेची माहिती वडोदबाजार पोलीस ठाण्यात देण्यात आली. नगर परिषद सिल्लोड येथील अग्निशमन व औरंगाबाद येथील अग्निशमन दलाला आगीची माहिती देण्यात आली. तब्बल दोन तासांनी घटनास्थळावर अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. तोपर्यंत जिनिंगवरील कामगारांनी आग आटोक्यात आणली होती.
सुदैवाने जीवितहानी टळली
सुदैवाने सीसीआय केंद्रात अचानक आग लागली. यात लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. ज्या ठिकाणी आग लागली तिथे एकही कर्मचारी नसल्याने जीवितहानी झाली नाही. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असल्याचे केंद्रप्रमुखांनी सांगितले. नेमके किती लाखांचे नुकसान झाले, याबाबत माहिती घेतली जात आहे.
------
५,७००० क्विंटल कापूस उरलेला होता
सरासरी मागील एक महिन्यात २७ हजार २३८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. त्यापैकी २१ हजार ५५१ क्विंटल कापसाचे प्रेसिंग करून गठाण तयार करीत सरकी वेगळी करण्यात आली, तर उर्वरित ५ हजार ७०० क्विंटल कापूस राजेंद्र फायबरच्या शेडमध्ये जमा होता. पत्राच्या शेडमध्ये जमा असलेल्या ५ हजार ७०० क्विंटल कापसाच्या गंजीला आग लागून त्यातील मोठ्या प्रमाणात कापूस जळून खाक झाला.
-------
फोटो : १