अजिंठा डोंगरात अठरा तास वणवा पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:07 AM2021-03-04T04:07:15+5:302021-03-04T04:07:15+5:30
सोयगाव : अजिंठ्याच्या डोंगरातील शिरसाळा तांडा (ता. सिल्लोड) हद्दीतील वन विभागाच्या राखीव जंगलाला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. तब्बल ...
सोयगाव : अजिंठ्याच्या डोंगरातील शिरसाळा तांडा (ता. सिल्लोड) हद्दीतील वन विभागाच्या राखीव जंगलाला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. तब्बल १८ तास सुरू असलेल्या या अग्नितांडवात मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली आहे. अथक प्रयत्नांनी सोयगाव व सिल्लोड वनपरिक्षेत्राच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली. नाहीतर मोठी हानी झाली असती.
अजिंठ्याच्या डोंगरात मंगळवारी रात्री आग लागल्याची माहिती मिळताच सोयगाव वनपरिक्षेत्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता अधिकच असल्याने आग नियंत्रणात आणताना या वन विभागाच्या पथकाची मोठी दमछाक झाली. एकतर आग विझविण्यासाठी वनमजुरांकडे कोणतेही आधुनिक साहित्य नव्हते, झाडांच्या फांद्यांचा वापर करून पारंपरिक पद्धतीने त्यांना कष्ट घ्यावे लागले. यात काहींच्या हाताला जखमा झाल्या. बुधवारी ११ वाजेपर्यंत पथकाला आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. या वणव्यात तब्बल तीन हेक्टरवरील राखीव जंगल खाक झाल्याचा पंचनामा वन विभागाने केला आहे, तसेच वनसंपत्तीसह चारा व गवत जळून खाक झाले आहे. या आगीमुळे वन्यप्राण्यांची जीव वाचविण्यासाठी धावपळ उडाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळे यांच्या नियंत्रणाखाली वनपाल गायकवाड (सिल्लोड), वनरक्षक मोरे, माया झिने, सोयगाव वनपाल गणेश सपकाळ, वन मजूर गोविंदा गांगुर्डे, संतोष जाधव, छगन झाल्टे, अमृत राठोड, राहुल दांडगे आदींच्या पथकाने ही आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले.
चौकट
आगीमुळे तीन गावांना झळ
अजिंठ्याच्या डोंगरात लागलेल्या आगीची तीव्रता इतकी प्रखर होती की, डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या निंबायती, रामपुरा तांडा, धिंगापूर, बहुलखेडा या चार गावांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
छायाचित्र ओळ :
सोयगाव वनपरिक्षेत्रात शिरसाला तांडा हद्दीत पेटलेला वणवा.