सातारा डोंगरावरील वणवा भल्या पहाटे शांत; कारण अद्याप अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 12:04 PM2021-02-12T12:04:36+5:302021-02-12T12:10:19+5:30

fire on Satara hills आगीमुळे नक्षत्रवाडी, कांचनवाडी, इटखेडा, सातारा डोंगर पायथ्याच्या वसाहतीमधील नागरिकांची झोप मात्र उडाली होती.

fire on Satara hills, stopped at morning; The reason is still unclear | सातारा डोंगरावरील वणवा भल्या पहाटे शांत; कारण अद्याप अस्पष्ट

सातारा डोंगरावरील वणवा भल्या पहाटे शांत; कारण अद्याप अस्पष्ट

googlenewsNext
ठळक मुद्दे ही आग एवढी मोठी होती की, शहराच्या विविध कानाकोपऱ्यातून दिसत होती. वारे वाहिले तसे वाळलेल्या गवताने पेट घेतल्याने आग पुढे पुढे सरकत गेली.

-साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : सातारा डोंगरावर बुधवारी सायंकाळी पेटलेला वणवा गुरुवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास आटोक्यात येत शांत झाला आणि मदतकार्य पथकाचा जीव भांड्यात पडला. वनविभाग आणि मनपाच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी पहाटेपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत होते. भारत बटालियन सुधाकर नगरच्या बाजूने असलेल्या डोंगरावरील कुरणे आगीने भस्मसात केली. ही आग एवढी मोठी होती की, शहराच्या विविध कानाकोपऱ्यातून दिसत होती. त्यामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागातून नागरिकांचे फोन अग्निशमन विभागाला जात होते.

डोंगरावरील घटनास्थळी गुरुवारी दुपारी लोकमत टीमने प्रत्यक्ष भेट दिली. कांचनवाडी, विटखेडा, सातारा परिसराच्या त्रिकोणी आकारात आग पसरल्याचे दिसत होते. वारे वाहिले तसे वाळलेल्या गवताने पेट घेतल्याने आग पुढे पुढे सरकत गेली. त्यामुळे नक्षत्रवाडी, कांचनवाडी, इटखेडा, सातारा डोंगर पायथ्याच्या वसाहतीमधील नागरिकांची झोप मात्र उडाली होती. सातारा बाजूकडील आग बुधवारी रात्री लवकर विझली. परंतु, कांचनवाडी परिसरातील आग पहाटे ३.३० वाजेपर्यंत धगधगत होती. भारत बटालियनच्या पाठीमागील डोंगरावरील पुरातन खंडोबा मंदिर क्षेत्रापर्यंत ही आग पोहोचली होती.

अग्निशमन विभागाचे पथक डोंगर पायथ्याला येऊन थांबले होते. आगीचा बंब व वाहन वर नेण्यासाठी रस्ता नसल्यामुळे या पथकास पायी चालत जावे लागले. झाडांच्या ओल्या फांद्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न, या पथकाने केले. डोंगरावरील पाऊलवाटामुळे गवताचे सलग रान आगीला मिळू शकले नाही. जेथे-जेथे पाऊलवाट आली तेथे आग आटोक्यात आणणे सोपे झाले.

आगीमध्ये पक्ष्यांची घरटी जळून राख झाली. घरट्यांच्या शोधात पक्षी आकाशात घिरट्या मारत होते. उघडेबोडके झालेले, होरपळून निष्पर्ण झालेले वृक्ष पाहून पक्ष्यांचा होणारा आक्रोश पाहणाऱ्यांचे हृदय हेलावून टाकत होता. सरडे, सरीसृप आदी सरपटणारे प्राणीही दिसत होते. जनावरांसाठीची वैरण या आगीत भस्मसात झाली. त्यामुळे गुराखी व त्यांची जनावरेही आज डोंगरावर दिसत नव्हती.

आग लावली कुणी?
आग कोणी लावली की लागली, याविषयी वनविभाग तसेच अग्निशमन विभाग यांच्याकडे कोणतेही उत्तर नाही.

डोंगरावर दरवर्षी आग लागते कशी...?
डोंगरमाथ्यावर अनेकांची शेती असून, कुणीतरी शेतातील गवत पेटवून दिले असावे; अथवा उनाडक्या करणाऱ्या लोकांपैकी कुणीतरी गवत पेटविण्याचा प्रयत्न केला असावा, असा तर्कवितर्क परिसरात जनावरे चारणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केला. आमच्या जनावरांची वैरण कुणीतरी हेतुपुरस्सर जाळून टाकली, असाही आरोप गोपालकांतून व्यक्त होताना दिसला.

यांनी जागून काढली रात्र...
वन परिक्षेत्र अधिकारी शशिकांत तांबे व त्यांची टीम तसेच परिसरातील स्थानिक नागरिक रंजीत पवार, राजू राठोड, बंटी चव्हाण, शुभम राठोड, प्रवीण चव्हाण, विजय चव्हाण, सुनील राठोड, अतुल चव्हाण, अक्षय राठोड यांच्यासह सिडको अग्निशमन दलाचे विजय राठोड, बापू घरत, श्रीकृष्णा होळंबे, वाहनचालक अब्दुल हमीद आदींनी रात्र जागून काढली. आग पुढे जाऊ नये म्हणून प्रयत्न केले. गुरुवारी पहाटे ३.३० वाजता आग आटोक्यात आल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Web Title: fire on Satara hills, stopped at morning; The reason is still unclear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.