मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पणानंतर अग्निशमन केंद्रांना कुलूप; कंत्राटी का होईना जवान भरती करा
By मुजीब देवणीकर | Published: October 27, 2023 06:54 PM2023-10-27T18:54:53+5:302023-10-27T18:56:40+5:30
५० अग्निशमन जवान, २० चालकांची दोन्ही केंद्रांना गरज आहे.
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १६ सप्टेंबर रोजी सिडको एन-९, कांचनवाडी येथील अग्निशमन केंद्रांचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला महिना उलटला तरी अद्याप ही केंद्रे सुरू नाहीत. हे केंद्र सुरू करण्यासाठी महापालिकेकडे कर्मचारी नाहीत. ५० अग्निशमन जवान, २० चालकांची दोन्ही केंद्रांना गरज आहे. कंत्राटी पद्धतीने का होईना; जवान देण्याची मागणी या विभागाने केली आहे.
शहराचा व्याप झपाट्याने वाढतोय. नगररचना विभागाच्या नवीन बांधकाम नियमावलीनुसार उंच इमारतींना सुद्धा परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे मनपाच्या अग्निशमन विभागाची जबाबदारी आणखी वाढू लागली. ५० हजार लोकसंख्येसाठी किमान १ अग्निशमन केंद्र असावे, असे निकष आहेत. शहराची लोकसंख्या १८ लाखांच्या आसपास आहे; पण महापालिकेची फक्त तीन केंद्रे सुरू आहेत. सिडको एन-९, कांचनवाडी येथे दोन नवीन केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी मागील काही महिन्यांमध्ये इमारती बांधण्यात आल्या. १६ सप्टेंबरचा मुहूर्त शोधून मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण केले; पण महिना उलटल्यानंतरही एकही केंद्र सुरू नाही. यामागे एकमेव मोठे कारण म्हणजे अग्निशमन विभागाकडे कर्मचारीच नाहीत. तीन केंद्रे अगोदरच कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सुरू आहेत. नवीन दोन केंद्रे सुरू करायची तर किमान ५० जवान, २० चालक हवे आहेत.
कंत्राटीसाठी दोन मतप्रवाह
अग्निशमन विभागाला ७० कंत्राटी कर्मचारी हवेत. माजी सैनिक घ्यावेत, अशी सूचना प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी केली. काही अधिकाऱ्यांनी नियमावर बोट ठेवले. अग्निशमन विभागाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच घेता येते. यामुळे भरती थांबली आहे.
फक्त दहा वाहने
अग्निशमन विभागाकडे अत्याधुनिक यंत्रसामुग्रीही नाही. उंच मजल्यावरील आग विझविण्यासाठी मोठे लॅडर नाहीत. सध्या या विभागाकडे रेस्क्यू वाहन, मिनी फायर टेंडरसह दहा वाहने आहेत. व्हीआयपी बंदोबस्त आला तर मोठी पंचाईत होते.
एमआयडीसीची इमारत गळकी
चिकलठाणा एमआयडीसी येथे एक अग्निशमन केंद्र आहे. याची इमारत एमआयडीसीची आहे. एमआयडीसी मनपाला वाहने देत नाही. सेवा देण्याचे दायित्व मनपावर आले आहे.
भरतीसाठी प्रयत्न सुरू
नवीन दोन अग्निशमन केंद्रे सुरू करण्यासाठी प्रशासन पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. लवकरच कर्मचारी उपलब्ध झाल्यावर दोन्ही केंद्रे सुरू होतील.
-आर. के. सुरे, मुख्य अग्निशमन अधिकारी.